Sadguru Sukhnath Baba Punyatithi: सुवर्ण नगरी, केळीचे आगार अशी जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. यासह आध्यात्मिकतेच्या बाबतीत देखील जळगाव जिल्ह्याची विशेष ओळख आहे. अशात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गाव आपल्या अध्यात्मिकतेबाबत प्रसिद्ध आहे. समर्थ सद्गुरू सुखनाथबाबांची समाधी स्थळ असलेल्या या गावात गेल्या 90 वर्षांपासून एक अनोखी परंपरा सुरु आहे. महाप्रसादाची ही परंपरा असून या ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी शेकडो क्विंटलचा महाप्रसाद वितरीत केला जातो. ही परंपरा 90 वर्षांपासून अखंडपणे सुरू असून महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात.
सन 1935 मध्ये फाल्गुन प्रतिपदेला वर्डीचे ग्रामदैवत सुखनाथ बाबांनी भक्तांच्या साक्षीने जिवंत समाधी घेतली होती. त्या दिवसापासून दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुखनाथबाबा यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव रघुनाथबाबा यांनी गादीची परंपरा सांभाळली. रघुनाथबाबा यांनीही 1979 मध्ये वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी समाधी घेतली. त्यानंतर त्यांचे जावई जगन्नाथबाबांनी गादीची परंपरा सांभाळली. जगन्नाथबाबा यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव दीनानाथ महाराज उर्फ भैय्या महाराज यांनी गादी परंपरा सुरू ठेवली आहे.
महाप्रसादासाठी 200 क्विंटल गहू
भंडाऱ्याच्या महाप्रसादासाठी 200 क्विंटल गहू, 50 क्विंटल तूरडाळ व साधारणतः चार ट्रॉली वांगी वापरली जाणार आहेत. शेकलेली बट्टी, वरण व वांग्याची भाजी असा महाप्रसाद राहणार आहे. महाप्रसाद तयार करण्यासाठी गावातील सर्व महिला, पुरुष व तरुण मंडळी उत्स्फूर्त सहभाग घेतात.
सामाजिक एकतेचे प्रतिक
समाजातील फूट आणि जातीयवाद दूर करून समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने या महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला अत्यंत साध्या पद्धतीने सुरू झालेला हा उपक्रम आज भव्य स्वरूप धारण करून लाखो भाविकांना आकर्षित करतो. गावकऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीन आणि लोकवर्गणीतून हा उत्सव आयोजित केला जातो. कोणतीही शासकीय मदत न घेता संपूर्ण खर्च गावकरी आणि भक्तगण उचलतात, ही या परंपरेची विशेष बाब आहे.
होळीच्या तयारीसाठी गावात अनेक दिवसांपूर्वीच हालचाली सुरू होतात. तरुण मंडळी जंगलातून लाकूड गोळा करतात. महिला, पुरुष, लहान मुले सर्वजण या तयारीत सहभागी होतात. तीन दिवस गावात उत्सवाचे वातावरण असते.
बाबांच्या समाधीला अभिषेक करून मिरवणूक
धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता बाबांच्या समाधीला अभिषेक करून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर भंडाऱ्याचा प्रसाद वाटप केला जातो. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि गुजरात येथूनही हजारो भाविक या उत्सवाला उपस्थित राहतात. हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा आहे.
चोपडा आगारातून जादा बसेस
सद्गुरु सुखनाथबाबांचा पुण्यतिथी सोहळा खूप प्रसिद्ध आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविकांची गर्दी होते. सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी लक्षात घेता चोपडा आगारातून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
असे होईल कार्यक्रम
वर्डी येथील ग्रामदैवत व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या समर्थ सद्गुरू सुखनाथबाबा यांच्या 91 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासह सकाळी 7 वाजेला आरती, 8 वाजेला समाधी अभिषेक, 9 वाजेला समाधी स्नान, 11 वाजला होमहवन, दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत महाप्रसाद, यादरम्यान सायंकाळी आरती व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाप्रसाद व पालखी मिरवणुकीचा लाभ घेण्याचे आवाहन भंडारा आयोजन समिती तसेच मठाधिपती दीनानाथ महाराज तसेच पोलिस पाटील पद्माकर महाराज व ग्रामस्थांनी केले आहे.











