Operation Tiger UBT Shivsena: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक भुकंप होणार आहे. त्यानुसार, शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. ठाकरेंचे सहा खासदार म्हणजेच फुटलेला गट दिल्लीत जात तर आज बुधवार, 17 जून रोजी आपल्या सह्यांचे पत्र सोबत घेऊन लोकसभा अध्यक्षांना भेटून ही सगळी प्रक्रिया दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण करणार असल्याची शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने माहिती दिली आहे.

ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब
ऑपरेशन टायगरवर अंतर्गत 10 जूनला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधे ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. रात्री 11 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला ओमराजे निंबाळकर देखील दिल्लीत उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकंदरीत एनडीएच्या बैठकीनंतर ‘ऑपरेशन टायगर’वर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ हा चर्चेचा विषय बनला होता. ‘ऑपरेशन टायगर’ म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानुसार, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील हे खासदार शिंदेच्या गटात जाणार हे स्पष्ट झाले आहे.










