होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, पोलिसांनी सुमारे ८ लाखांचा दंड केला वसूल!

On: June 16, 2026 4:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Amalner News: वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांविरोधात (Amalner Police) अमळनेर विभागीय पोलिसांनी विशेष मोहीम राबवत गेल्या दीड महिन्यात ७७१ वाहनांवर कारवाई केली असून तब्बल ७ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय पोलिस उपअधीक्षक विनायक कोते (Deputy Suprintendent Of Police Vinayak Kote) यांनी दिली.

वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, वाहन चालवतांना मोबाईलचा वापर करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, परवान्याशिवाय वाहन चालवणे, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे, हेल्मेटचा वापर टाळणे, बेशिस्त पार्किंग करणे आणि तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण वाहने रस्त्यावर आणणे यांसारख्या प्रकारांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

विभागनिहाय कारवाई

अमळनेर हद्दीत अवैध प्रवासी वाहतुकीच्या २०, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १६ आणि इतर ४०१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ लाख ८९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पारोळा (Parola) हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ९, मद्यपान करणाऱ्या ४ आणि इतर ६५ वाहनांवर कारवाई करून ६० हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

एरंडोल (Erandol) हद्दीत अवैध प्रवासी वाहतुकीच्या १४, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १६ आणि इतर १५२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ३२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला. मारवड हद्दीत अवैध प्रवासी वाहतुकीच्या ७ आणि इतर ६७ वाहनांवर कारवाई करून १ लाख १० हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

अवैध प्रवासी वाहतूक, कर्कश सायलेन्सरचा वापर, मद्यपान करून वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे डीवायएसपी विनायक कोते यांनी स्पष्ट केले. कारवाईचा उद्देश नागरिकांना शिक्षा करणे नसून वाहतुकीत शिस्त निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. मात्र नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment