America Iran Deal Effect: अमेरिका आणि इराणने युद्ध संपवण्यासाठी एका आराखडा करारावर सहमती दर्शवल्याचे सांगितल्यानंतर तेलाच्या किमती घसरल्या आणि शेअर बाजारात तेजी आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, या करारामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा सुरू होईल. भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११०० अंकाने तर निफ्टी ३५० अंकांनी वाढला आहे. भाजता बाजारात सकारात्मक संदेश गेल्याने त्यांचा परिणाम आता दिसून येत आहे.
जागतिक तेल मानक असलेल्या ब्रेंट क्रूडच्या दरात ३,३३ टक्के घसरण होऊन ते प्रति बॅरल ७९.८३ डॉलरवर आले आणि या कराराच्या प्रतिक्रियेमुळे आशिया आणि युरोपमधील शेअर बाजारात तेजी आली. अमेरिका-इराण युद्ध संपवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानने सांगितले की, शुक्रवार, १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये अधिकृत स्वाक्षरी समारंभ आयोजित केला जाईल.

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचा करार पूर्ण केल्याचे म्हटल्याने तेलाच्या किमती घसरल्याने, सोमवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात तेजीने झाली. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स १,१०० हून अधिक अंकांनी वधारला, तर निफ्टी ३५० अंकांनी वाढला.
इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सरकारी टीव्हीवरील फोन कॉलमध्ये अमेरिकेसोबतचा करार अंतिम झाल्याची पुष्टी केली, तर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर “तेलाचा प्रवाह सुरू होऊ द्या!” अशी पोस्ट केली.
परंतु, ऊर्जा बाजार विश्लेषण करणारी कंपनी ‘वांडा इनसाइट्स’च्या वंदना हरी यांनी सांगितले की, करारात नेमके काय ठरले आहे, याबद्दल तपशिलाचा अभाव असल्याने “बाजारात अस्वस्थता आणि अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे”.यामुळे तेल बाजारात अनिश्चितता आणि अस्थिरतेचा आठवडा येऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले सुरू केल्यानंतर लगेचच होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद करण्यात आली आहे. संघर्ष सुरू झाल्यानंतर, तेहरानने या महत्त्वपूर्ण जलमार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती, ज्यामधून सामान्यतः जगातील सुमारे २०% तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) जातो. असे वृत्त बीबीसीने दिले आहे.
आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी
गुंतवणूकदारांनी फ्रेमवर्क कराराचे स्वागत केल्यामुळे सोमवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी आली. जपानचा निक्केई २२५ शेअर निर्देशांक ५% वाढीसह बंद झाला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ५.२% वाढीसह बंद झाला.
हा प्रदेश तेल आणि एलएनजी पुरवठ्यासाठी मध्य पूर्वेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने, वाढलेल्या ऊर्जा किमतींचा त्याला विशेषतः मोठा फटका बसला.
युरोपमध्ये, जर्मनीचा डॅक्स आणि फ्रान्सचा कॅक ४० हे दोन्ही निर्देशांक सुमारे १.७% नी वाढले आणि लंडनमध्ये एफटीएसई १०० ०.६% नी वाढला.







