Jayapur News: देशभरात कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनांची हाक दिली आहे, युवकांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा मागितला जात आहे, या आंदोलनासाठी अभिजित दीपके जयपूरमध्ये होते. जयपूरमधील शहीद स्मारकाजवळ नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना थप्पड मारली. त्यानंतर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. तसेच तत्पर्वी दोघा तरुणांना जमावाने चोप दिला.
..तो तरुण म्हणाला, आंदोलक जिहादी मानसिकतेचे
ज्या तरुणाने थप्पड मारली तो म्हणाला, “हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. मी जयपूरचा आहे. मी एक राष्ट्रवादी आहे. हा अभिजीत दीपके विनाकारण देशाची दिशाभूल करत आहे. ही पेपरफुटी केवळ एक निमित्त आहे.” कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, बेरोजगारी आणि इतर विद्यार्थी-युवकांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आंदोलनाचे आयोजन केले. आंदोलनादरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.

थप्पडबाजीच्या घटनेनंतर तणाव वाढला
जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके Abhijit Dipke) यांच्याशी संबंधित आंदोलना दरम्यान धक्काबुक्की आणि गोंधळाची घटना घडली. सोमवारी शहीद स्मारकाजवळ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने अभिजीत दीपके यांना थप्पड मारली. आंदोलना दरम्यान झालेल्या वाद आणि थप्पडबाजीच्या घटनेनंतर काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. घटनास्थळी गोंधळ माजल्याने पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलकांना घटनास्थळावरून हटवले. या घटनेसंदर्भात पोलिसांकडून सध्या कारवाई केली जात आहे.
‘सीजेपी’कडून उत्तरदायित्वाची मागणी
सीजेपीचे (CJP) राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, शिक्षणाशी संबंधित मुद्दे आता केवळ परीक्षेतील अनियमिततेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. विद्यार्थी, तरुण आणि पालक एका चांगल्या आणि पारदर्शक प्रणालीची मागणी करत आहेत. त्यांनी शिक्षण व्यवस्थेत सर्वसमावेशक सुधारणा आणि उत्तरदायित्वाच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
अभिजीत दीपके रविवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये दाखल झाले. जयपूर पोलिसांनी काही अटींच्या अधीन राहून आंदोलनासाठी परवानगी दिली. प्रशासनाने या कार्यक्रमात जास्तीत जास्त ८०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली. कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या व्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्याच्या सूचनाही आयोजकांना देण्यात आल्या होत्या. यापूर्वी पक्षाने दिल्लीतील जंतर मंतर, पुणे, लखनौ, अमृतसर, बंगळूर आणि हैदराबादसह अनेक शहरांमध्ये आंदोलने केली आहेत. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करत संघटना राष्ट्रीय मोहीम सुरू करत असल्याचे सांगत आहे.











