Nashik Crime: नाशिकमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे, नाशिकच्या तपोवन रोड भागात गोदावरी नदीच्या काठावर एका काळ्या रंगाची सुटकेस बॅग आढळली. त्यात चैन उघडून बघितले तर पोलीस देखील हादरले, सुटकेस उघडल्यावर त्यामध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव संबंधित बॅग ताब्यात घेत तपास सुरू केला.

दरम्यान या घटनेची मिळालेली माहिती अशी की, सफाई कर्मचारी सतीश घोडुंबे यांना साफसफाई करतांना ती बॅग दिसली, ते म्हणाले, सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास परिसरात साफसफाई सुरू होती. अचानक माझे लक्ष एका बॅगेकडे गेले. त्या बॅगेजवळ गेल्यावर त्यातून तीव्र दुर्गंधी येत होती. बॅगेबाबत अधिक संशय आल्याने मी बॅगेचा फोटो काढून आमच्या सुपरवायझरला पाठवला. त्यानंतर पोलिसांना फोन करून माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी
दरम्यान पोलिसांना फोन केल्यावर माहिती मिळताच पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. आडगाव पोलीस ठाण्याचे क्राईम ब्रँच युनिट-१ आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी करण्यास सुरवात केली. चैन खोलल्यावर त्यांनी जे पाहिले त्याने ते ही हादरले सुटकेस मध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून फॉरेन्सिक टीमने महत्त्वाची पुरावे गोळा केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
शवविच्छेदन अहवाल काय म्हणतो?
दरम्यान अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. साधारण पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा कयास आहे. मृत्यूचे नेमके कारण, महिलेची ओळख आणि सुटकेस मध्ये हा मृतदेह येथे कोणी आणला याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही आहे का याची हे माहिती पोलीस घेत आहे. प्रथमदर्शनी खुनाची घटना दिसून येत असली तरी नेमकी माहिती घेऊन या प्रकरणाचा छडा लावण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत, फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतर सर्व प्रकरण समोर येईल. मात्र सध्या नाशिक पोलीस सर्व बाजुंनी या प्रकरणाचा तपास करत आहे.







