Jalgaon News: उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पाचोरा, जामनेर, बोदवड ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प निर्णायक वळणावर पोहोचला असून, भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाचोरा-जामनेर या जुन्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून तो पुढे बोदवडपर्यंत विस्तारित करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे 84 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे इतके दिवस उपेक्षित राहिलेला खान्देशचा काही भाग रेल्वेच्या मुख्य जाळ्याशी अधिक प्रभावीपणे जोडला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेंतर्गत या प्रकल्पासाठी सुमारे 955 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे 568 कोटी रुपयांचे कंत्राट अशोका बिल्डकॉन कंपनीला देण्यात आला आहे. निर्धारित कालावधीत म्हणजेच 30 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एप्रिल अखेरीस संपूर्ण भूसंपादन पूर्ण होईल आणि मे महिन्यापासून प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी माध्यमांना दिली आहे.
पहूर स्थानकाजवळ मालधक्का
पाचोरा,जामनेर, बोदवड रेल्वेमार्गामुळे सध्या अत्यंत व्यस्त असलेल्या भुसावळ-मनमाड मुख्य मार्गावरील ताण मोठ्याप्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या मालगाड्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होणार आहे. विशेषतः कोळसा, धान्य, खत आणि औद्योगिक मालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून, वाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पात माल वाहतुकीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
पहूर स्थानकाजवळ मालधक्का उभारण्यास मंजुरी मिळाल्यामुळे स्थानिक उद्योग, शेती उत्पादन आणि व्यापाराला मोठा फायदा होणार आहे. कापूस, केळी, धान्य यांसारख्या कृषी उत्पादनांची जलद वाहतूक शक्य होणार असून, शेतकऱ्यांना अधिक चांगल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचता येईल. तसेच लघुउद्योग आणि व्यापाऱ्यांसाठीही हा मार्ग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.








