Amalner News: अमळनेर तालुक्यातील मुख्य नदी तापी व उपनद्या बोरी आणि पांझरा पट्ट्यात पाण्याची सोय असल्यामुळे सर्वाधिक केळी, पपई आणि उसाची लागवड केलेली आहे. मात्र, भूजल पातळी खालावल्याने आणि नद्या प्रवाहीत होण्याचे बंद झाल्याने केळी, पपईची पिके वाचवणे जिकिरीचे झाले आहे. त्यात सलग चार दिवस उन्हाची तीव्रता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच 40 अंशावरच्या वर गेल्याने पाडळसरे परिसरातील तापी पांझरा, बोरी भागातील पपई व केळीची कोवळी पाने गळून केळी, पपई पिके कोमेजून गेली.
पीकविमा कवच घेतलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे कळवूनही आतापर्यंत कंपनीकडून दखल घेतली गेली नाही. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे दुपारी सलग दोन तास केळीला पाणी देण्यासाठी शेतकरी भर उन्हात चटके सोसून केळीला वाचवण्याची धडपड करीत आहे.
अमळनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर उन्हाचा पारा 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. या उष्णतेच्या लाटांमुळे जमिनीतील पाणी अधिक वेगाने कमी होत असून, याचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा बसू लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. याचाच परिणाम म्हणून अमळनेर तालुक्यातील आठ गावांना आतापासूनच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठायला सुरुवात झाल्याने गावाला व पशुधनाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे पाणी टंचाईवर परिणाम म्हणून तालुक्यातील चौबारी, गडखांब, धुपी, मांजड, धानोरा, भोरटेक, पळासदडे, जुनोने या आठही गावांसाठी पाणी टंचाई निवरणार्थ विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ग्रामपंचायतकडून प्रस्ताव अमळनेर पंचायत समितीत सादर करण्यात आला आहे. त्यावर गटविकास अधिकारी एन.आर.पाटील यांनी त्यातील गडखांब, धुपी, मांजड, जुनोने या गावांचा विहीर अधिग्रहणसाठी तहसीलदारांना प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. तर चौबारी आणि पळासदडे या गावाचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे सादर करून लवकरच मंजूर होतील, अशी माहिती पाणी टंचाई कक्षाचे दीपक पाटील यांनी दै.‘शौर्य मराठी’शी बोलतांना दिली.








