होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

घाईची पेरणी टाळा; समाधानकारक पावसानंतरच खरीप हंगामाला सुरुवात करा: पालकमंत्री गुलाबराव पाटील

On: June 15, 2026 12:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Dharangaon News: यंदा मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता असल्याने शेतकरी बांधवांनी घाईघाईने पेरणी करू नये. पुरेसा व सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्वमान्सूनच्या सरी कोसळल्या असल्या तरी बहुतांश भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या पावसावर पेरणी केल्यास त्यानंतर पावसात खंड पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बियाण्यांची उगवण कमी होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

दरम्यान दुबार पेरणीमुळे बियाणे, खते, मशागत व मजुरीचा अतिरिक्त खर्च वाढतो. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करणे आवश्यक आहे. साधारणपणे ७५ ते १०० मिलिमीटरपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीच्या प्रकारानुसार पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांनी केवळ कॅलेंडर पाहून नव्हे, तर प्रत्यक्ष पावसाची स्थिती, हवामानाचा अंदाज आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन पेरणी करावी. तसेच कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

बियाण्यांची निवड, बियाणे प्रक्रिया, पिकांचे योग्य नियोजन आणि शास्त्रशुद्ध पेरणी पद्धतीचा अवलंब केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर संयम आणि योग्य नियोजनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मेहनती आणि जिद्दी आहे. मात्र निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे घाईपेक्षा संयम अधिक महत्त्वाचा आहे.

शासन, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि दुबार पेरणीची वेळ येऊ नये, यासाठीच हे आवाहन करण्यात येत आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. थोडा संयम ठेवा, पावसाची खात्री करा आणि मगच पेरणी करा. घाईची पेरणी टाळा, दुबार पेरणीचे संकट टाळा, असा संदेश देत त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जबाबदारीने खरीप हंगामाचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment