Pune News: साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू होत असून, या गाडीला १७ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. पुणे आणि शिर्डी यांच्यात थेट रेल्वेसेवेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. नव्या गाडीमुळे साईभक्त, पर्यटक तसेच सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि किफायतशीर होणार आहे.
पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक केंद्र मानले जाते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे साईबाबांचे समाधीस्थळ असल्याने देशभरातील लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असतात. या नव्या रेल्वेसेवेमुळे पुणे आणि शिर्डी यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होणार असून धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

प्रवाशांना होणारे फायदे
या रेल्वेसेवेमुळे पुणे ते शिर्डी असा थेट प्रवास प्रथमच शक्य होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबीय आणि समूहाने प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रस्ते प्रवासातील थकवा कमी होऊन आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.
तसेच अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधा आणि रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे शिर्डी परिसरातील हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाचे थांबे
*पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस दौंड कॉर्ड केबिन, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
*दौंड कॉर्ड केबिन : पुणे-दौंड आणि दौंड-मनमाड मार्गावरील प्रवाशांसाठी उपयुक्त.
*श्रीगोंदा : शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना जलद व किफायतशीर प्रवासाची सुविधा.
*अहिल्यानगर : प्रशासकीय, लष्करी आणि व्यावसायिक केंद्र असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांना लाभ.
*राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठामुळे विद्यार्थी, संशोधक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा थांबा.
*बेलापूर : साखर उद्योग तसेच शनि शिंगणापूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी उपयुक्त.
*मध्य रेल्वेच्या या नव्या सेवेमुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील संपर्क वाढणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.










