Varangaon News: वरणगाव शहरातील बस स्टँड चौकातील तिरंगा सर्कल जवळ पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती कित्येक महिन्यापासून लागली आहे. बस स्टँड भागात नळ आल्यावर या जलवाहिनी जमिनींत फुटली असल्याने जमिनीच्या बाहेर रस्त्यावर लाखो लिटर प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याची नासाडी होत असते. पाणी नासाडीच्या या प्रकाराकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. दररोज याच मार्गावरून नागरिकांनी ज्यांना निवडून दिले ते नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका याच मार्गावरून नगरपरिषदेत जातात. परंतु एकही नगरसेवक या प्रकाराकडे लक्ष देत नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि चीड निर्माण होत आहे.
बस स्टँड चौकातील मुख्य जलवाहिनीला जमिनीत लिकेज् असल्याने पाणी जेव्हा येते तेव्हा या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जाते. नगरपरिषदेच्या या अक्षम्य उदासीनतेमुळे स्थानिक नागरिक आणि दररोज या मुख्य रस्त्यावरून ये जा करणारे वाहनधारकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शहरात सध्या काही प्रभागांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन सुरू करण्यात आले आहे, तर काही भागात ते अद्याप प्रलंबित आहे. असे असतानाच, जुन्या नळ कनेक्शनमधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. बस स्टँड चौकात ज्या दिवशी पाणी सुटेल त्या दिवशी या तिरंगा सर्कल जवळ दिवशी चक्क पाण्याचा पाट वाहताना दिसुन येतो. प्रत्येक लाईनला ठराविक अंतराने साधारणपणे तीन तास पाणी सोडले जाते, आणि याच दरम्यान शेकडो लिटर पाणी दररोज जलवाहिनीतून शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून वाया जाते. हा प्रकार कित्येक महिन्यापासून सुरू असून याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.
न.पा. कर्मचारी येतात पाहणी करून निघून जातात
या समस्येबाबत काही जागरूक नागरिकांनी नगर परिषद कार्यालयाशी अनेकदा संपर्क साधून आणि लेखी व तोंडी तक्रारी केल्या. मात्र, प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषदचे कर्मचारी केवळ घटनास्थळी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम मात्र अद्यापही केले नसल्याचे दिसुन येत आहे.
तिरंगा सर्कल जवळ सततच्या पाणी गळतीमुळे बसस्थानक चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली असून, तिथे धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे दुचाकी घसरून किंवा खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
एकीकडे पाण्याची टंचाई दुसरीकडे नासाडी
शहरात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेळसावत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी नळ कधी येतील याची चिंता असते. तर दुसरीकडे पाणी येते तेव्हा बस स्टँड भागात मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जाते याला जबाबदार कोण? या जलवाहिनीची गळती थांबेल का? पाणी पुरवठा अभियंता यांना याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? कर्मचारी या ठिकाणचे लिकेज् शोधून वाया जाणारे पाणी थांबवतील का? हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल.
दरम्यान, या प्रकाराबाबात न.पा. पाणीपुरवठा सभापती निलेश खाचणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. बस स्टँड भागात याच नवीन टाकण्यात आलेल्या पाईप लाईन मधून पाणीपुरवठा होणार होता. तिरंगा सर्कल जवडील लिकेज् झालेली जलवाहिनी कायमची बंद होणार होती. त्यामुळे लिकेज् झालेल्या जलवाहिनीला दुरुस्ती करण्यासाठी दिरंगाई होत होती. आता नवीन पाईप लाईनद्वारे पाणी सुटणार नसल्याचे ठेकेदाराने सांगितल्याने येत्या आठ दिवसात तिरंगा सर्कल जवडील मुख्य लिकेज् जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येईल, असे ते म्हणाले.






