होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वरणगावातील ४९६ घरांवर भूसंपादनाची टांगती तलवार; रेल्वेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गासाठी

On: June 22, 2026 5:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: भुसावळ-बडनेरा- वर्धा तिसरी व चौथी रेल्वे लाईन उभारण्याच्या विशेष प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याचा मोठा फटका वरणगाव शहराला बसण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिनियम १९८९ तसेच भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८ च्या कलम २०(A) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार मौजे वरणगाव येथील मोठ्या प्रमाणावरील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रस्तावित संपादनामुळे सुमारे ४९६ घरे बाधित होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम

भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,भुसावळ यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून ती वरणगाव तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, अनेक नागरिकांना याबाबत वैयक्तिक अथवा अधिकृत नोटीस प्राप्त झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज लिमिटेडच्या महाविद्यालय परिसरापासून ते श्री नागेश्वर महादेव मंदिर परिसरापर्यंतच्या भागातील अनेक निवासी घरे, प्लॉटधारकांची मालमत्ता आणि इतर बांधकामे या प्रकल्पाच्या कक्षेत येत आहेत. अनेक कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वास्तव्यास असून, त्यांच्या निवासस्थानांवर आता भूसंपादनाचे संकट ओढवले आहे.

नागरिकांच्या पुनर्वसनाचे काय?

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रश्न केवळ जमिनीच्या मोबदल्यापुरता मर्यादित नसून हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहे. अनेक कुटुंबांची घरे, व्यवसाय, दुकाने आणि उपजीविकेची साधने या भागात आहेत. त्यामुळे योग्य मोबदला, पर्यायी जागा आणि पुनर्वसनाची स्पष्ट योजना जाहीर केल्याशिवाय भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांनी प्रशासन आणि रेल्वे विभागाकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. नेमकी किती घरे बाधित होणार, किती जमीन संपादित केली जाणार, मोबदल्याचे निकष काय असतील आणि पुनर्वसनाची व्यवस्था कशी असेल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तिसरी आणि चौथी रेल्वेलाईन

दरम्यान, भुसावळ–बडनेरा–वर्धा मार्गावरील वाढती रेल्वे वाहतूक लक्षात घेता तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन उभारणे हा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाचे मत आहे. मात्र विकासकामांसोबत नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि न्याय्य पुनर्वसन तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

‘या’ गावांचा समावेश

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भुसावळ यांनी जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांना पाठविलेल्या पत्रानुसार, भूसंपादन प्रस्ताव क्रमांक ११ ते २५ (२०२६) अंतर्गत भुसावळ व बोदवड तालुक्यातील फुलगाव, जाडगाव, वरणगाव, सुसरी, तळवेल, आचेगाव, पिंपळगाव बु., जुनोने, कोल्हाडी, नांदगाव, नाडगाव, वरखेडे खुर्द, सोनोटी, पळासखंडे खुर्द आणि निमखेड येथील खाजगी जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.
या संदर्भातील कलम २०A ची अधिसूचना दोन सर्वाधिक खपाच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिसूचना वाचण्यायोग्य स्वरूपात प्रकाशित करण्याबरोबरच प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रांच्या प्रती भूसंपादन कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित गावांतील ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसीलदारांना अधिसूचना नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या रेल्वे प्रकल्पामुळे विद्यमान रेल्वे मार्गाची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी अधिक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लवकरच संयुक्त बैठक

याप्रकरणी लवकरच नागरिक, प्लॉटधारक आणि विविध सामाजिक संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून, पुढील आंदोलनात्मक भूमिका किंवा कायदेशीर पर्यायांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरणगावातील शेकडो कुटुंबांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रकरणाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment