ISRO Gets Bomb Threat: देशाची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘इस्रो’च्या बंगळुरू येथील मुख्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवारी प्राप्त झाली. यामुळे एकच खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे ही धमकी दिली. दरम्यान, खबरदारी म्हणून सुरक्षा यंत्रणांकडून मुख्यालयाचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता. या ई मलनतर तातडीने पावले उचलत प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
डॉग स्क्वॉड आणि बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी
इस्रोच्या मुख्यालयाला धमकीचा ईमेल मिळताच सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलीस, श्वान पथक आणि बॉम्बशोधक व नासधूस विरोधी पथकाने तात्काळ इस्रो मुख्यालय गाठले. सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ सर्व शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा पथकांनी संपूर्ण परिसराची कोनाकोपरा न कोनाकोपरा तपासला. धमकीचा ईमेल फेक ठरला.

इस्रोच्या अंतराळ उपक्रम व्यवस्थापनाचे मुख्य केंद्र
बंगळुरू येथील इस्रो मुख्यालयाच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असते. हे केंद्र इस्रोच्या सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ उपक्रमांचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘कमांड सेंटर’ म्हणून काम करते. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी बंगळुरूमध्ये झाली; त्यापूर्वी 1962 मध्ये ती ‘इनकोस्पार’ (INCOSPAR) म्हणून अस्तित्वात आली होती. त्यानंतर, 1972 मध्ये तिला ‘अंतराळ विभागा’च्या अखत्यारीत आणण्यात आले. इस्रो मुख्यालयाला बॉम्बची धमकी देणाऱ्या व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीबाबत बेंगळुरू पोलीस उत्तर प्रदेश पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत.











