Jalgaon News: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अंतर्गत बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने सातारा जिल्हा संघावर मात करून बॉक्सिंग स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकावले आहे. तर सातारा जिल्हा संघाची झुंज अपयशी ठरली, त्यांना अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. विजेत्या खेळाडूंना खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत राज्यातील २५ जिल्ह्यातील ५१७ खेळाडू सहभागी झाले होते. विजेत्या संघाची निवड जालंधर येथील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी होणार आहे.
धरणगावला स्पर्धेचा मान
बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडली. ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील व १५ वर्षांखालील मुले व मुलींचा या राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धत सहभाग होता. बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावतर्फे दि. ११ ते १५ जूनदरम्यान धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील सुगोकी लॉन्स अँड रिसॉर्ट येथे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

खेळाडूंचा मोठा प्रतिसाद
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल ५१७ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे स्पर्धेला राज्यस्तरावर मोठा प्रतिसाद मिळाला. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक रोमांचक आणि चुरशीचे सामने रंगले. खेळाडूंनी आपल्या कौशल्य, वेग, ताकद आणि तांत्रिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली, आणि ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली.
स्पर्धेचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष रंजीत सावरकर यांच्या हस्ते झाले होते. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव डॉ. राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलन वैद्य, अनिल त्रिवेदी, उद्योजक गोपाल कासट, बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष धनराज कासट, जिल्हा उपाध्यक्ष नरेेंद्र मोरे, जिल्हा सचिव चुणीलाल गुप्ता, सुनील नावगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व सुगोकी गृपचे गोपाल कासट यांचे विशेष सहकार्य लाभले.
पंजाब येथे राष्ट्रीय स्पर्धा
स्पर्धेतील सांघिक गटात पुणे जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर सातारा जिल्ह्याने उपविजेतेपद मिळविले. विविध वजनी गटांतील विजेत्या खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले आहे. हे खेळाडू दि २३ ते ३० जूनदरम्यान पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
खेळाडूंनी नावलौकिक मिळवावा: बाविस्कर
धरणगाव येथे आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत सुमारे खेळाडू, पंच, खेळाशी संबंधित १२०० ते १५०० लोक आले होते, एकूण राज्यातील २५ जिल्ह्यांचा समावेश या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत समावेश होता.महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशने सहकार्याने आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला, खेळाडूंना नावलैकिक मिळविण्याची चांगली संधी आहे, एकूण ५१७ खेळाडू उस्फुर्तपणे सहभागी झाले होते, असे बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर यांनी सांगितले. विजेत्या संघाला जालंधर येथील राष्ट्रीय स्पर्धेची संधी मिळणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.










