Jalgaon News: जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची ठरणारी आणखी एक मोठी घडामोड घडली असून, जामनेर तालुक्यात हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचा ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने हालचाली वाढवल्या आहेत. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. प्रकल्पाची अंमलबजावणी, आवश्यक पायाभूत सुविधा आणि विविध प्रशासकीय बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
जळगाव औद्योगिक नकाशावर
दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेदरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जागतिक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष स्वरूप मिळू लागले असून, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने जामनेर येथे अत्याधुनिक ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे जळगाव जिल्हा औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे पुढे येणार असल्याचे मानले जात आहे.

१२०० कोटींची गुंतवणूक
कोका-कोलाने महाराष्ट्रात सुमारे १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून, जामनेरमधील प्रकल्पामुळे हजारो युवकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उत्पादन, पॅकेजिंग, वेअरहाऊसिंग, वाहतूक, लॉजिस्टिक्स, देखभाल, सुरक्षा, केटरिंग आणि इतर पूरक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोजगारासह पूरक उद्योगांनाही चालना
कृषिपूरक उद्योगांना फायदा
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसच्या प्रकल्पामुळे जामनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकणार आहे. स्थानिक उद्योगांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार असून, लघु व मध्यम उद्योगांना पुरवठा साखळीत सहभागी होण्याची संधी मिळेल. याशिवाय कृषीपूरक उद्योग, पॅकेजिंग साहित्य निर्मिती, वाहतूक व्यवसाय, कोल्ड स्टोरेज, गोदाम व्यवस्था आणि सेवा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.
पायाभूत सुविधा उभारणी
प्रकल्पाच्या उभारणीमुळे परिसरातील रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दळणवळण व्यवस्था तसेच इतर मूलभूत पायाभूत सुविधांचा विकासही वेगाने होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह शेतकरी, व्यापारी आणि लघुउद्योजकांनाही या प्रकल्पाचा थेट लाभ होईल. औद्योगिक गुंतवणुकीमुळे जामनेर तालुक्याच्या विकासाला नवे परिमाण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उच्चस्तरीय बैठकीत अंमलबजावणीचा आढावा
प्रकल्पावर चर्चा
विधानभवनातील बैठकीला मंत्री गिरीश महाजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जामनेरमधील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, जमीन, पायाभूत सुविधा आणि उद्योगास आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने उद्योगपूरक धोरणे, सुलभ परवानगी प्रक्रिया आणि गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनात्मक सुविधांमुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक पसंतीचे गुंतवणूक राज्य म्हणून उदयास येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामनेरमधील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून, तो प्रत्यक्षात आल्यानंतर केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासालाही नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.










