Delhi News: पुढील दोन वर्षांत एनसीसीएफ आणि नाफेड डाळींचा प्रत्येक दाणा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतील,तसेच २०१४ मध्ये बंद पडण्याच्या मार्गावर असलेली नाफेड आज मोदी सरकारच्या काळात ५०० कोटी रुपयांच्या नफ्यासह ७४ लाख शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहे.
आता दलाल संपुष्टात येऊन शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे ४८ तासांच्या आत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. नवी दिल्ली येथे ‘नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (नाफेड) च्या ‘NAFEX.in’ या ई-लिलाव पोर्टलचे उद्घाटन मंगळवारी शहा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नाफेडचे चार उपक्रम सुरू
या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, ‘नाफेड’ने आज NAFEX.in, DRISHTI, ERP आणि ‘नाफेड कल्याण’ हे चार महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. ते म्हणाले की, NAFEX.in सह इतर उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत; कारण २०१४ मध्ये ‘नाफेड’ बंद पडण्याच्या मार्गावर होती, परंतु या प्रयत्नांमुळे आज ‘नाफेड’ ३० हजार कोटी रुपये उलाढाल आणि पाचशे कोटी रुपये नफ्यासह देशातील ७४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सेवा करत आहे. शाह म्हणाले की, जेव्हा ‘नाफेड’ गंभीर आर्थिक संकटात होती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती पूर्ण पारदर्शकतेने चालवण्याचा निर्णय घेतला होता. भारत सरकारने आर्थिक मदत पुरवून ‘नाफेड’ला पुन्हा एकदा भक्कम स्थितीत आणले असल्याचे त्यांनी सांगितले.

डाळीचा प्रत्येक दाणा खरेदी करणार
अमित शाह म्हणाले की, उत्पादन आणि खरेदी या दोन्ही आघाड्यांवर आज ‘नाफेड’ने लक्षणीय वाढ नोंदवली आहे. डाळींच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी, शेतकऱ्यांकडून डाळीचा प्रत्येक दाणा खरेदी केला जावा यासाठी ‘एनसीसीएफ’ आणि ‘नाफेड’ ला अधिक वेगाने पावले उचलावी लागतील. यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीरपणे योग्य आणि वाजवी भाव मिळणे सुनिश्चित होईल, परिणामी डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रात आपसूकच वाढ होऊन देशाला डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होणे शक्य होईल.
गेल्या तीन वर्षांत डाळी, मका आणि इतर शेतीमालाच्या थेट खरेदीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असल्याचे सांगून आता ही यंत्रणा तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ यांनी पूर्ण निर्धाराने आणि पारदर्शकतेने काम करणे गरजेचे असून त्यामुळेच अपेक्षित परिणाम साध्य होतील, असेही शाह यांनी सांगितले. पुढील दोन वर्षांत सर्व शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या डाळींची या दोन संस्थांना थेट विक्री करता येईल आणि त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, हे सुनिश्चित केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
तोट्यातील नाफेड नफ्यात
आज ‘नाफेड’ चे कार्य केवळ कृषी उत्पादनांच्या खरेदीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. गेल्या तीन वर्षांत नाफेडने सेंद्रिय शेती, बियाणे उत्पादन, किरकोळ व्यापार, जैव-खत निर्मिती, अन्नसुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांसारख्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे नाफेडचे महत्त्व आणि नफाक्षमता या दोन्हींमध्ये वाढ झाली असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा नाफेडची उलाढाल २० हजार कोटी रुपये होती, ती आता वाढून ३० हजार कोटी रुपये झाली आहे. पुढील दोन वर्षांत ही उलाढाल ५० हजार कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाफेडचा निव्वळ नफा १३९ कोटी रुपयांवरून ४०५ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे आणि त्याची निव्वळ मत्ता ३५८ कोटी रुपयांवरून २,०५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. नाफेड आज एक सक्षम, आर्थिकदृष्ट्या समर्थ आणि आत्मनिर्भर संस्था म्हणून उदयाला आली आहे. आता नाफेड आणि एनसीसीएफ यांनी पूर्ण पारदर्शकतेसह शेतकऱ्यांकडून थेट कडधान्ये आणि इतर पिकांचा प्रत्येक दाणा खरेदी करण्याची, मध्यस्थांचे संपूर्ण जाळे नष्ट करण्याची आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा नफा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे, असे शाह यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत
सहकार मंत्री म्हणाले की, नाफेड ने आपल्या नफ्यातील १ टक्के रक्कम शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि करिअर विकासासाठी शिष्यवृत्ती म्हणून राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या तरतुदीमुळे शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेताना आणि करिअर घडवताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त आदरांजली वाहिली. शाह म्हणाले की, याच दिवशी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक राष्ट्र, एक विधान, एक प्रधान’ हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि देशाला अखंड ठेवण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले होते. गृहमंत्री म्हणाले की, आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न साकार झाले आहे. कलम ३७० रद्द करण्यात आले आहे आणि त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे सरकार गंगोत्रीपासून ते बंगालमधील गंगासागरापर्यंत सत्तेवर आहे.











