Nagpur Crime News : नागपुरातून डोकं चक्रवणारी घटना समोर आली आहे. तेलंगणाच्या एक चोरट्याने चक्क दीड कोटी रुपयांची एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस चोरल्याचा प्रताप घडला आहे. नागपूरच्या बसस्थानकातून चोरी झालेली ही ‘शिवाई’ बस अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चोरट्यासह पकडली केली आहे. अटक करण्यात आलेला हा चोरटा आंतरराज्यीय टोळीचा भाग असून त्याने दिलेली माहिती ऐकून स्वतः पोलीसही चक्रावून गेले आहेत.
या बाबात माहिती अशी की, नागपूरमधील इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर 1 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ‘एमएच 49/ बी. झेड. 8258’ क्रमांकाची 1 कोटी 53 लाख रुपये किमतीची ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस उभी होती. चोराने सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत तब्बल ही बस तिथून पळवून नेली. एसटी महामंडळाची बस चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ एक संशयास्पद बस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच ही बस चोरणारा तरुण राजापेठ येथील गद्रे चौकात थांबल्याचे समजताच, राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने सापळा रचून बससह चोरट्याला ताब्यात घेतले.
इलेक्ट्रॉनिक चीपमुळे आरोपी जाळ्यात
नागपूर शहरातील इमामवाडा डेपोची ही ई-बस मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास बाहेर काढून आरोपी सुसाट वेगाने अमरावतीकडे पळाला. सकाळी 9 वाजेपर्यंत बस आगारात परत न आल्यामुळे सुरक्षारक्षक सुरेंद्र मिश्रा यांनी आगार व्यवस्थापक इमरान पटेल यांना माहिती दिली. या बसमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असल्याने अधिकाऱ्यांनी इंटरनेटवर तिचे लोकेशन तपासले असता ती अमरावतीजवळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, नागपूर कंट्रोलने अमरावती पोलिसांना अलर्ट केले आणि राजापेठ पोलिसांनी आरोपीला बससह अटक केली. एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. या सिस्टीममधील चीपच्या माध्यमातून बस नेमकी कोठे आहे, याची अचूक माहिती रिअल-टाइमसह उपलब्ध होते.
त्यानुसार, पोलिसांनी चोरट्याला पकडले. पकडलेल्या या आरोपीचे नाव विष्णू गणपती नीलावर (वय २३, रा. हईत नगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे आहे. त्याने आतापर्यंत तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून तब्बल 20 बसेस चोरल्या आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील नांदेड बसस्थानकावरूनही त्याने यापूर्वी एक बस पळवली होती.






