Pachora News: पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांची रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. बुधवारी पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील कॅश मोटारीत घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.
त्यामुळे एटीएममधील तब्बल 8,89,700 रुपये इतकी रोकड पोलीस वेळेत पोहोचल्यामुळे चोरीस जाण्यापासून वाचली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटे सुमारे 3.45 वाजेदरम्यान जारगाव येथे सारोळा रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात काही अज्ञात व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच हवालदार हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी कोणताही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तेथे पोहोचले असता एटीएम मशीन गॅस कटरने तोडण्यात आलेले होते. मशीनमधील रोख रक्कम असलेले कॅश कॅबिनेट बाहेर काढून ते काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनात चढविण्याची तयारी सुरू होती. घटनास्थळी तीन तरुण उपस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र पोलिसांना पाहताच तिन्ही संशयितांनी क्षणाचाही विलंब न करता वाहनात बसून तारखेडा मार्गे धूम ठोकली.
संशयितांनी वापरलेल्या वाहनाचा क्रमांक एमएच 49 सीएस 7028 असा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहनातून पळून गेल्यानंतर पाचोरा पोलिसांनी तातडीने संशयितांचा पाठलाग सुरू केला. संशयितांचा माग काढत पोलिसांचे पथक धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत पोहोचले. मात्र अंधार आणि वेगवान हालचालींचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने विविध टोल नाक्यांवर वाहनाची माहिती प्रसारित केली. तसेच धुळे जिल्हा पोलीस, मध्य प्रदेशातील नियंत्रण कक्ष आणि इतर संबंधित यंत्रणांनाही संशयित वाहनाबाबत सतर्क करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, वाहनाच्या हालचाली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या सतर्कतेने रक्क्कम सुरक्षित
दरम्यान, एटीएममध्ये तब्बल 8,89,700 रुपये इतकी रोकड असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पोलीस वेळेत पोहोचल्यामुळे ही संपूर्ण रक्कम चोरीस जाण्यापासून वाचली. अन्यथा चोरट्यांनी एटीएममधील लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.






