होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अतिवृष्टीचा धोका: शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर; नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा: देवेंद्र फडणवीस

On: July 6, 2026 5:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री (Chief Minister)म्हणाले की, हवामानातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि जोरदार वाऱ्यासारख्या घटना या निसर्गाच्या बदललेल्या चक्राचा भाग आहेत. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाने पूर्वतयारी केली असली तरी काही वेळा अपेक्षेपेक्षा वेगळ्या घटना घडतात. मात्र अशा प्रत्येक परिस्थितीत महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित सर्व विभाग रस्त्यावर उतरून तातडीने मदतकार्य करत आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक ठिकाणी त्वरित वाहतूक वळविणे, रस्ते बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणणे तसेच पाण्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री यांनी सांगितले की, संभाव्य धोका लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांत धोकादायक भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून त्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

अनावश्यक प्रवास टाळावा

मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून दुपारनंतर राज्यातील काही भागांत जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, शक्यतो प्रवास टाळावा आणि कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक बाहेर पडू नये. विशेषतः तरुणांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणे पूर्णपणे टाळावे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

परिस्थितीवर लक्ष ठेवून

मुख्यमंत्री यांनी सांगितले की, राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नियमित आढावा घेतला जात आहे. सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी यंत्रणेत कमतरता राहणार नाही आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच, गेल्या दोन-तीन दिवसांतील घटनांबाबत, करण्यात आलेल्या मदतकार्याबाबत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर निवेदन उद्या सादर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

नाशिक व त्रंबकेश्वर परिसरातील पर्यटकांची विशेष खबरदारी घ्यावी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अरबी समुद्रावर बनत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात उद्या ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुमारे ३०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. कुठेही जीवित हानी होणार नाही, याबाबतही दक्ष रहावे.

ही परिस्थिती लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. बंद होऊ शकणारे रस्ते, दरडी कोसळण्याची ठिकाणी अशा सर्वंकष बाबींचा विचार करून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पर्यटकांनी जावू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. पुढील ४८ तास ‘शून्य बळी’ हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, असेही मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले. मुंबई शहरात एका महिन्याच्या सरासरी इतका पाऊस अवघ्या चार दिवसांत नोंदवण्यात आला आहे. विशेषतः भरतीच्या काळात अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर आपत्तीजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. काल मुंबई शहरात  ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहताना निदर्शनास आले. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. साधारणपणे संपूर्ण चार महिन्यांच्या मान्सूनमध्ये जितकी झाडे पडतात, त्यापैकी जवळपास ३०० झाडे एकाच दिवशी पडली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

येत्या तीन दिवसांत, म्हणजे ८ जुलैच्या रात्रीपर्यंत, हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे. दरम्यान, भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम कराव, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा. खाजगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर फ्रॉम होम जे सवलत द्यावी असे न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून संबंधित विभागाचा आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव (नगरविकास) के. एच. गोविंदराज, प्रधान सचिव (जलसंपदा) एकनाथ डवले,मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सचिव (आरोग्य) ई. रविंद्रन, संचालक श्री. चव्हाण आदी उपस्थित होते

थोडक्यात पावसाची माहिती

आज ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यात १५१.२ मिलिमीटर पाऊस झाला असून मुंबई शहरामध्ये १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात २३६.६, ठाणे जिल्ह्यात १५८.७ रत्नागिरीमध्ये १५२.३ पावसाची नोंद झाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment