Savda News: सावदा (Savda) येथील पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पाणी टंचाईवरून नगरपालिकेला धारेवर धरले असून नागरिकांना पाणी टंचाईतून मुक्ती केव्हा मिळणार असा प्रश्न पाणीपुरवठा सभापतींना केला आहे. नागरिकांनी तक्रार करून देखील त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने नागरीकांनी निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे.
सभापतींना निवेदन
सविस्तर वृत्त असे की, ख्वाजा नगर येथील नागरिकांनी नगरपालिकेला पाणी टंचाईसंदर्भात एक निवेदन सादर केले आणि त्यांनी त्यात पाण्याच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या नागरिकांनी पाणी पुरवठा सभापती फिरोज खान यांना देखील निवेदनाद्वारे जाब विचारत सामान्य जनतेला पाणी टंचाईतून मुक्ती केव्हा मिळणार, असा खडा सवाल केला. या भागातील नागरिकांनी लोकांनी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने प्रशासनाला जाब विचारला आहे.
पाणी टंचाई आणि अस्वच्छता
जर १५ वर्षांपासून मदिना नगर ताजुशरिया नगर मध्ये हेमा महाजन यांनी आपल्या शेतातील टुबवेलचे पाणी आमच्या शेजारी वस्तीत दिले नसते तर या भागातील लोकांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागला असता. नगरपालिका फक्त कर वसूल करते आणि सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी टाळाटाळ करीत असते. असा आरोप नागरिकांनी केला. सर्वत्र अस्वच्छता असून गटारी साफसफाई दर रोज होत नाही आणि पालिकेत तक्रारी केल्यास नगरपालिकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिले जात, सफाई कर्मचारी कमी असल्याने तसेच हद्दवाढ झाल्याने पुरेसे कर्मचारी वर्गाची कमतरता भासत आहे, असे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी पाणी पुरवठा सभापती, आरोग्य सभापती आणि नगरपालिका प्रशासनाने केली आहे.

सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. याप्रसंगी हाजी कादिर साहब तसेच माजी उप नगराध्यक्षा सौ नंदा ताई लोखंडे रौफ खान, युसूफ खान,वसीम अनबी,हसीना बी शेख,सलीम बाबू टेलर, अनिस पटवे, शेख कमरु आदी नागरीक उपस्थित होते.










