होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनांसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

On: June 18, 2026 4:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या ‘वेलकम किट’ने प्रत्येक रुग्णाचे स्वागत करण्यात यावे तसेच आरोग्यमित्र आणि रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना आवश्यक ती मदत, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची बैठक आरोग्य भवन, मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राज्यस्तरीय अधिकारी, अंमलबजावणी सहाय्य संस्थाचे प्रतिनिधी, शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोफत, दर्जेदार उपचार देण्याची जबाबदारी

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कोणतीही आर्थिक मागणी न करता पूर्णपणे मोफत व दर्जेदार उपचार मिळणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत पात्र रुग्णाला उपचार नाकारले जाणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक असून योजनेची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्यमित्राची भूमिका महत्त्वाची

आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, रुग्णांना योजनेंतर्गत सेवा मिळवून देण्यासाठी आरोग्यमित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आरोग्यमित्रांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि क्षमता विकास यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. रुग्णांना योजनांचा लाभ सहज आणि वेळेत मिळण्यासाठी आरोग्यमित्रांनी अधिक संवेदनशीलतेने कार्य करावे.

राज्यातील पात्र नागरिकांना अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी सर्व घटकांनी समन्वय, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भूमिका निभावावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अंमलबजावणी आढावा

बैठकीदरम्यान योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. लाभार्थ्यांना सेवा देताना वापरण्यात येणाऱ्या एचईएमपोर्टल, टीएमएसपोर्टल आणि बीआयएस पोर्टल या विविध डिजिटल प्रणाली व प्रक्रियांबाबत रुग्णालय प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील सादरीकरणही करण्यात आले.

यावेळी सहभागी रुग्णालयांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून विविध सूचना व प्रश्न मांडले. प्री-ऑथरायझेशन मंजुरीसाठी लागणारा कालावधी कमी करणे, नियमित डायलिसिस रुग्णांना प्रत्येक सायकलसाठी ई-केवायसीच्या सक्तीमधून सूट देणे तसेच काही अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) पॅकेजेसच्या दरांमध्ये सुधारणा करणे यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी या सर्व प्रश्नांवर सविस्तर स्पष्टीकरण देत आवश्यक कार्यवाहीबाबत माहिती दिली.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या ‘वेलकम किट’चे लोकार्पण या वेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment