Varangaon News: भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील पूर्णा नदीपात्रात महसूल प्रशासनाने सोमवारी सकाळी अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले. या कारवाईत सुमारे ४ लाख ९५ हजार रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला असून, अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, या कारवाईनंतर उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री आणि त्यामागील जबाबदार व्यक्तींवर कारवाई का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महसूल पथकाने (एमएच-१९-सीएक्स-९३४०) आणि (एमएच-१९-सीडब्ल्यू-९३४०) हे दोन डंपर पकडले. दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी चार ब्रास मुरूम आढळून आला. चालकांकडे वैध परवाना अथवा रॉयल्टी पावती नसल्याने वाहने जप्त करण्यात आली.
नदीपात्रात अवैध उत्खनन
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या डंपरमधील मुरूम नदीपात्रातून काढण्यात आला असल्याचे स्पष्ट होत असताना, त्यासाठी वापरण्यात आलेली पोकलँडसारखी जड यंत्रे कारवाईच्या वेळी आढळून आली नाहीत. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्या यंत्रसामग्रीचा आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्णा नदीपात्रात अवैध उत्खननाची हालचाल अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे केवळ वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही .अवैध गौणखनिज व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ उत्खनन करणाऱ्या घटकांना मिळत असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे या प्रकरणात केवळ डंपर चालक व मालकांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता, उत्खननासाठी वापरलेली यंत्रसामग्री आणि संबंधित जबाबदारांवरही कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील आणि तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या पथकाने केली.










