Mumbai News: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. शिंदे यांनी सचिन अहिर यांना गळाला लावून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील खंदे समर्थक आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेषतः यावेळी मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.
सर्वांच्या भुवया उंचावल्या
काल परवापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आणि आदित्य ठाकरें यांच्यासोबत वावरणारे सचिन अहिर यांनी मंगळवारी शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सर्वांच्या भुवया उंचावल्या, आज सकाळपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी कुणाला संधी मिळणार याची चर्चा होती. वेगवान राजकीय हालचाली झाल्यावर आज अचानक शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली. या धक्कादायक राजकीय घडामोडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ आणखी कमी झाले आहे. आता ठाकरे गटाकडे केवळ ५ आमदार उरले आहेत.

सचिन अहिर यांनी दिलेल्या धक्क्यानंतर आता विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत खालील 5 आमदार राहिले आहेत. त्यामध्ये अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, ज. मो. अभ्यंकर, सुनील शिंदे असे पाच आमदार राहील आहेत सचिन अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा २०२८ पर्यंत आहे. मात्र त्या[पूर्वीच त्यांनी शिंदे सेनेला साथ दिली.
वरळीचा तह?
सचिन अहिर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून २०१९ मध्ये प्रवेश केल्यानंतर उपनेतेपद दिलं, पुण्याचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस म्हणून ते काम पाहत होते. खासदार संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी उपसभापती पदाची संधी बघून आणि भविष्यातील आमदारकीचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याची चेच राजकीय वर्तुळात आहे. सध्याचे महाविकास आघाडीचे संख्याबळ बघता सचिन अहिर पुन्हा विधान परिषदेवर निवडून येणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतला. तसेच वरळी विधानसभेची जागा ही आदित्य ठाकरे यांना जाणार असल्याने विधानसभेसाठी सचिन अहिर यांची अडचण झाली होती.
पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले..
सचिन अहिर यांच्याकडे जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून पहिले जाते, त्यांनी आज महायुतीतून उपसभापतीपदाचा अर्ज भरला आहे, उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. फक्त मुंबईच नाही तर उपसभापती म्हणून ते महाराष्ट्राचे काम करतील, ते असल्याने शिवसेनेची ताकद मुंबई कामगार क्षेत्रात वाढेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्याची माफक अपेक्षा असते, आज विधानपरिषद आमदार गोकुळ गीतेदेखील सहयोगी पक्ष म्हणून आमच्या सोबत आहेत, आम्ही तोडायला नाही, जोडायला आलो आहोत. सकारात्मक आणि प्रॅक्टिकल रहाणे ही आमची भूमिका आहे, असे ही शिंदेंनी म्हणाले.
आता काय आरती करायची का?
ज्यांना सगळं काही दिले ते आपल्या स्वार्थासाठी सोडून गेले, सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं?, अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची? जवळचे आणि ज्यांना सगळं काही मिळतं तेच निघून जातात. कुणाच्या जाण्याने धक्का बसत नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे.आमचं तिकडचं काम बोलेल असे सांगून तुम्हाला अजून काय हवंय, आणखी काय ओरबाडाणार?, सगळ्या परिवाराला काही ना काही दिलंय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.











