Jalgaon News: हल्ली वाङ्मय चोरीच्या घटना घडत असतांना साहित्यविश्वातुन अभिमानाची व सकारात्मक बातमी समोर आली आहे. कवी, लेखक, पत्रकार आणि गीतकार प्रकाश तेली यांच्या ‘जीवन म्हणजे काय?’ या पुस्तकाला भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील बौद्धिक संपदा कार्यालयाकडून अधिकृत कॉपीराइट नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
याअगोदर सुद्धा प्रकाश तेली यांच्या “प्रेरणादायी विचार” या ग्रंथाला कॉपीराइट नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तेली यांना नुकतेच ‘कॉपीराइट निबंधकांची स्वाक्षरी असलेले अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तेली यांच्या अतुलनीय साहित्य कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत बोलतांना तेली यांनी आपल्या वाचक, हितचिंतक आणि स्नेहींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यासर्वांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले असे त्यांनी सांगीतले.

‘जीवन म्हणजे काय’ या पुस्तकामध्ये संपूर्ण जीवनाचे सार सांगण्यात आले असून हे पुस्तक जीवनाला दिशा देणारे आहे. या पुस्तकात जीवनाचे वास्तव सांगण्यात आले असून हे पुस्तक जीवन जगतांना सर्वाना मार्गदर्शन करते. प्रकाश तेली यांचे आतापर्यंत २१ पुस्तके प्रकाशित झालेली असून लवकरच तीन पुस्तके येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश तेली यांनी ५ हजार कविता आणि ७ हजार घोषवाक्य लिहिलेली असून त्यांनी कविता व घोषवाक्य लेखनात जागतिक विक्रम केलेला आहे. प्रकाश तेली लवकरच सिनेमासाठी डायलॉग लिहिणार आहेत. जीवन म्हणजे काय? हे पुस्तक जीवनाला दिशा देणारे, सकारात्मकता वाढवणारे आणि प्रेरणा देणारे असल्याने वाचकांकडून या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रकाश तेली यांनी साहित्य क्षेत्रासोबत पत्रकारिता, सामाजिक आणि गीतलेखन क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.










