Varangaon News: वरणगाव शहरात गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक व संभाव्य कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. वरणगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत एकूण सात गोवंश जनावरे आणि एक चारचाकी वाहन जप्त करून मोठे यश मिळवले आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गंगाराम कॉलनी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे बांधून ठेवण्यात आली असून त्यांचा वापर कत्तल किंवा अवैध वाहतुकीसाठी होण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.
जनावरे आणि वाहन जप्त
पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता एका पत्र्याच्या शेडमध्ये तसेच जवळच उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 19 CY 9743) वाहनात गोवंश जातीची जनावरे आढळून आली. तपासणीदरम्यान जनावरांना चारा-पाणी नसल्याचे तसेच त्यांना अमानुषपणे बांधून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.या कारवाईत अंदाजे 3,49,000 रुपये किमतीची एकूण सात जनावरे (गाय व बैल) जप्त करण्यात आली असून त्यामध्ये विविध वयाची व रंगांची जनावरे समाविष्ट आहेत. तसेच संबंधित पिकअप वाहना सह चालक राजीक रफीक करेशी रा. गंगाराम कॉलनी वरणगांव ता. भुसावळ असे सांगून त्यास गाडीत जनावरे हे सोहेल शेख बशिर रा. गंगाराम कॉलनी वरणगांव याचे मालकीचे असल्याचे सागितले. पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कत्तलीसाठी अवैध वाहतूक?
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, ही जनावरे कत्तल व अवैध वाहतुकीच्या उद्देशाने ठेवण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जप्त करण्यात आलेली जनावरे तात्काळ सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम, 1995 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांची धडक कारवाई
वरणगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.यात सुकराम सावकारे,भुषण माळी, उमेश बारी, गोपीचंद सोनवणे, प्रेमचंद सपकाळे, श्रीकृष्ण देशमुख आदींच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहे.










