Varangaon News: शहरासह ग्रामीण परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतात असलेले रोहित्र वारंवार जळणे नादुरुस्त होणे तसेच कमी दाबाने वीजपुरवठा आणि बेकायदेशीर घरात बसविण्यात येत असलेले स्मार्ट मीटर अशा विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या समस्या ताबडतोड सोडण्याची मागणी शिवसेनेतर्फे (शिंदे गट) करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंगळवार ३० जून रोजी सकाळी ११ वाजता शिवसेनेतर्फे वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजता शिवसेना संपर्क कार्यालय बस स्टँड येथून वीज वितरण कार्यालय येथे शिवसेनेतर्फे लोकशाही पद्धतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी वीज वितरण विभागाचे संबंधित ग्रामीण आणि शहरी अभियंता, कर्मचारी आदींनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात.

उद्या मंगळवार रोजी होणाऱ्या या आंदोलनात ग्रामीण भागातील आणि वरणगाव शहरातील शेतकरी, नागरिक, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने बस स्टँड जवळील शिवसेना संपर्क कार्यालय येथे सकाळी १० वाजता हजर राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा प्रमुख संतोष माळी, शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला तालुकाप्रमुख रेखा देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.










