Jalgaon News: लेवा एज्युकेशनल युनियन संचलित महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांना त्यांच्या न्याय्य हक्काच्या सेवानिवृत्ती वेतन व लाभांसाठी प्रशासकीय आणि संस्था पातळीवर प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि सहसंचालक कार्यालय यांच्या कथित साटेलोट्यामुळे डॉ. राणे यांचे निवृत्ती वेतन तब्बल 18 महिने विलंबाने प्राप्त झाले. मात्र,अद्यापही त्यांच्याकडील 10 महिन्यांच्या व्याजाची हक्काची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. नियमबाह्य आणि बोगस शिक्षक वेतन प्रस्ताव तयार करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळेच सूडबुद्धीने हा छळ सुरू असल्याचा आरोप डॉ.एस.एस.राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
डॉ. राणे पुढे म्हणाले की, माझ्या कार्यकाळात संस्थेतील नियमबाह्य, बेकायदेशीर व बोगस शिक्षक वेतन प्रस्ताव तयार करण्यास नम्रपणे नकार दिला होता. मी तसली चुकीची कामे करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळेच त्यांनी आकसबुद्धीने व मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव विहित मुदतीत सादर केला गेला नाही. शासन निर्णय व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त व्यक्तीच्या बाबतीत कोणतीही चौकशी समिती नेमता येत नाही. तरीही श्री.बेंडाळे यांनी बेकायदेशीर व नियमबाह्य समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील व समितीचे सदसस्य होते. या बेकायदेशीर समितीने केवळ 8 महिन्यांचेच व्याज देण्याची चुकीची व अन्यायकारक शिफारस केली. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 4 मार्च 2022 च्या निर्णयानुसार, सेवानिवृत्तीच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंतच्या कालावधीचे व्याज देणे अनिवार्य आहे.
त्यामुळे त्यांना संपूर्ण 18 महिन्यांचे व्याज मिळणे हा कायदेशीर हक्क आहे. संस्थेने दिलेल्या 6 महिन्यांच्या व्याजाचा चेक डॉ. राणे यांनी दि. 30 डिसेंबर 2024 रोजी तीव्र निषेध नोंदवून स्वीकारला आहे. त्यांचे उर्वरित 10 महिन्यांचे व्याज अद्यापही थकीत असून ते मिळवणे हा माझा कायदेशीर हक्क आहे. या संपूर्ण अन्यायाविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ हा डॉ. राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. या संघटनेच्या पदाधिकार्यांनी नंदकुमार बेंडाळे यांची भेट घेऊन हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्याची विनंती केली होती. परंतु, श्री. बेंडाळे यांनी आम्हाला महाराष्ट्र शासनाचे जीआर लागू नाहीत, असे निरर्थक व धक्कादायक वक्तव्य करत वृत्तपत्रांमध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन डॉ. राणे व संघटनेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रकाश इंगळे यांनी केला.जोपर्यंत डॉ. राणे यांना त्यांच्या हक्काच्या उर्वरित 10 महिन्यांची थकीत रक्कम व्याजासह आणि पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत रा.मु.ब.क. संघाचा हा लढा आणि आंदोलन अधिक तीव्रतेने सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.यावेळी रा.मु.ब.क.चे कार्याध्यक्ष विक्रम सोनवणे, जिल्हा अध्यक्ष विलास चिकणे, जिल्हा महासचिव आनंद जाधव आदी उपस्थित होते.










