Nashik News: ‘एफडीए’ने (FDA )राज्यभर अन्न भेसळखोरांच्या विरोधात कारवाईला वेगा दिला असून विशेषतः हॉटेल चालकांचे आता धाबे दणाणले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या दोन दिवस म्हणजेच दि. १ आणि २ जुलै रोजी राबविलेल्या मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील २० मोठी हॉटेल्स आणि इतर खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी विभागातील सात हॉटेलांचे अन्न परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.
तपासणीत नियमांचे पायमल्ली
हॉटेल किंवा इतर अन्न उपलब्ध असलेल्या आस्थापनांमध्ये अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव आणि त्यांची वैद्यकीय तपासणी न करणे अशा गंभीर त्रुटी समोर आल्या आहे. तसेच नियमानुसार आवश्यक असलेली कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नसणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा न ठेवणे, या कारणांमुळे या सात हॉटेलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

‘या’ हॉटेल्सवर केली कारवाई
यात नाशिक मधील नामवंत हॉटेलचा समावेश आहे, त्यात हॉटेल ग्रीन वॉल (जत्रा-लिंक रोड, नाशिक), हॉटेल राधिका (द्वारका, नाशिक), हॉटेल क्राऊन पॅलेस (पेठरोड, नाशिक, लक्ष्मी हॉटेल (सिन्नर, नाशिक), हॉटेल भानू (जळगाव) हॉटेल त्रिमूर्ती (एमआयडीसी, जळगाव), जाधव रेस्टॉरंट (नंदुरबार), आदी हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. याआधी प्रशासनाने तपासणी करून त्रुटी सुधारण्यासाठी काही हॉटेलांना कायदेशीर सुधारणा नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत या त्रुटींची पूर्तता न केल्याने भुसावळ आणि धुळ्यातील दोन आस्थापनांचे परवानेही अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केले आहेत.
चार मोठ्या आस्थापना दणका
दरम्यान या तपासणीदरम्यान चार मोठ्या आस्थापनांकडे वैध अन्न व्यवसाय नोंदणी किंवा परवानाच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यांना वैध परवाना प्राप्त करेपर्यंत अन्न व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. व्यावसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक व हाताळणीबाबत कायद्याचे पालन करावे,असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने (Mangesh Mane) यांनी केले.











