Varangan News: ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिले’.. या म्हणीचा प्रत्यय वरणगाव येथे आला. विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेला भोगावती नदीवरील पूल आज तब्बल १५ वर्षांपासून जोड रस्ता नसल्याने वापराविना धूळ खात पडला असून, दुसरीकडे नागरिकांना जीव धोक्यात घालून जुन्याच मार्गाने प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती वरणगाव शहरात पाहायला मिळत आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
जोड रस्त्याचा अभाव
वरणगाव शहरातील जुन्या गावाकडे जाण्यासाठी भोगावती नदी हा मुख्य अडसर ठरत असल्याने वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अक्सा नगरलगत दुसरा पूल उभारण्याची मागणी नागरिकांनी अनेक वर्षांपूर्वी केली होती. त्यानुसार तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्री संजय सावकारे यांच्या निधीतून सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून पूल उभारण्यात आला. मात्र पुलाला जोडणारा रस्ता आजपर्यंत तयार न झाल्यामुळे हा पूल नागरिकांच्या कोणत्याही उपयोगाचा ठरलेला नाही.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रामपेठ परिसरातील काही खासगी जमिनींचा प्रश्न आणि त्यासंदर्भातील न्यायालयीन वादामुळे पुलाकडे जाणारा रस्ता रखडला आहे. परिणामी लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारलेला पूल केवळ शोभेची वस्तू बनून राहिला आहे.
जुन्या पुलाची अवस्था धोकादायक
सध्या नागरिक ज्या जुन्या पुलाचा वापर करतात, त्या पुलालगत मोठा खड्डा पडला असून परिसरात काटेरी झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत धोकादायक बनतो. विशेषतः बाजारासाठी पायी जाणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, हातमजुरी करणारे कामगार आणि विद्यार्थी यांना जीव मुठीत धरून या मार्गाने प्रवास करावा लागतो.दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी मोठी होळी, वंजारी वाडा, चौधरी वाडा, नारीमळा, विठ्ठल-रुक्मिणी नगर, अक्सा नगर, खिडकी वाडा यांसह अनेक भागांतील नागरिक या मार्गाचा वापर करतात. बाजाराच्या पिशव्या घेऊन येणाऱ्या महिलांना चिखलातून मार्ग काढावा लागतो. अनेकदा पाय घसरून दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

अपघाताची शक्यता वाढली
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलालगत पडलेला मोठा खड्डा आणि वाढलेली झुडपे यामुळे रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या मार्गाचा वापर शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच विविध ठिकाणी कामासाठी जाणारे कामगारदेखील करतात. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
लोकप्रतिनिधींनी वास्तव पाहावे
नागरिकांनी लोकप्रतिनिधींना थेट आवाहन करत, “एकदा पावसाळ्यात किंवा मंगळवारी बाजाराच्या दिवशी या मार्गाने पायी चालत जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवा,” अशी मागणी केली आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण नागरिकांनी करून दिली आहे.
तातडीने उपाययोजनांची मागणी
भोगावती नदीवरील वापरात नसलेल्या पुलाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून तो नागरिकांसाठी खुला करावा, सध्या वापरात असलेल्या पुलालगतचा खड्डा तात्काळ बुजवावा, वाढलेली झाडे-झुडपे हटवावीत आणि पावसाळ्यापूर्वी सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. वरणगावच्या जनतेने विकासाच्या अपेक्षेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आता केवळ आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष कृती करून हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.










