Jalgaon News: शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. 1 जुलैपासून मनपाने शहरात विशेष मोहीम हाती घेतली असून, दररोज विविध प्रभागांमध्ये जाऊन भटक्या कुत्र्यांना पकडण्याची कारवाई केली जात आहे. यासाठी मनपाने विशेष श्वान पथकाची नियुक्ती केली असून, यात 1 डॉक्टर, 4 हेल्पर, 1 चालक आणि 3 श्वान पकडणारे कर्मचारी अशा अनुभवी पथकाचा समावेश आहे.
या मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी 14, दुसऱ्या दिवशी 15 आणि 3 जुलै रोजी 14 असे एकूण 43 श्वान शहरातील विविध भागांतून पकडण्यात आले आहेत. यामध्ये ओंकार नगर, गांधी नगर, जोशी कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर, तांबापुरा आणि प्रतापनगर या भागांचा प्रामुख्याने समावेश आहे.
लसीकरण करून पुन्हा सोडणार
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 18 श्वानांचे यशस्वी निर्बीजीकरण करण्यात आले. निर्बीजीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या श्वानांना तीन दिवस केंद्रात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जात आहे. त्यानंतर त्यांना अँटी-रेबीज लस (रेबीज प्रतिबंधक लस) देऊन पुन्हा त्याच भागात सुरक्षितपणे सोडण्यात येत आहे. सध्या मनपाच्या श्वान नियंत्रण केंद्रात एकूण 69 श्वानांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्यावर उपचार व देखरेख सुरू असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










