Amalner News: तालुक्यातील शहापूर येथे वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी घडली. राकेश पाटील असे शेतकऱ्याचे नाव आहे. अस्मानी संकटाला बळीराजा नेहमीच तोंड देतो. यावेळेस मात्र अस्मानी संकट असे कोसळले की एका घरातील आधारवड हिरावून नेला, त्याच्या जाण्याने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान दिवंगत राकेश पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शहापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती शोकाकुल ग्रामस्थांनी दिली.
घटना अशी आहे
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर येथील राकेश रतिलाल पाटील (वय ३२) हे मंगळवारी दुपारी सुमारे १२.४५ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपून वासरे शहापूर रोडवरुन घराकडे परतत होते. अचानक वातावरणात बदल होऊन ढगांचा गडगडाट सुरु झाला आणि काही क्षणांतच त्या परिसरात आकाशीय वीज कोसळली. विजेचा प्रहार इतका तीव्र होता की या दुर्घटनेत राकेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेतातील निंबाच्या झाडाखाली उभे राहिले होते. मात्र त्याचवेळी अचानक वीज कोसळून ती त्यांच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गावावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत राकेश पाटील यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी ,दोन बहिणी असा परिवार आहे. पाच वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. राकेश पाटील यांच्या अकाली निधनामुळे शहापूर गावासह परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.गावातील एक उमदा, मेहनती आणि शेतीशी नाळ जोडलेला तरुण काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
“देवा… निसर्गाने आणि परिस्थितीने माझ्या शेतकरी राजावर अगोदरच अनेक संकटे आणली, आणि आज पुन्हा अस्मानी संकटाने त्यालाच हिरावून नेले… काल्या मातीत घाम गाळणान्या या कष्टकरी लेकराची आणि त्याच्या परिवाराची तुला दया आली नाही का?” अशा भावना आज शहापूर गावातील अनेकांच्या मनातून व्यस्त होताना दिसत आहेत.










