Latest Weather Update: बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्रातही मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. पालघर, रायगड आणि पुणे घाटमाथा परिसर या तीन जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून येथे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून अतिवृष्टीचा इशारा ही दिला आहे. ठाणे,पालघर, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा घाट परिसराला ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जळगावसह १८ जिल्ह्याना येलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ४ ते ६ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात, कोकण-गोवा मुसळधार पावसाची इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबईला पावसाचा तडाखा, एकाचा मृत्यू
गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान मुंबईत २४ तासात २६५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती, मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरूच असून पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, अधून मधून ताशी ६०-७० कि मी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सि अस आणि 23 अंश सेल्सि अस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कुर्ला येथे झाड पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
‘या’ जिल्ह्याना येलो अलर्ट
जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकला उद्या येलो अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच या जिल्हयांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे, त्यात कोल्हापूर घाट,संभाजीनगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा,चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया नागपूर,वर्धा, वाशीम, यवतमाळ आदीचा समावेश असून याठिकाणी मुसळधार व अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टीची दाट शक्यता
उद्या ६ जुलै रोजी कोकण व गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टीची दाट शक्यता. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची (ताशी ४०-५० किमी) दाट शक्यता. महाराष्ट्र आणि कोकण व गोवा किनारपट्टीवर आणि समुद्रात ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची आणि वाऱ्याचा वेग ६० किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे सुस्पष्ट क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवस देशाच्या मध्य भागात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. ४ ते ७ जुलै दरम्यान कोकण आणि गुजरात प्रदेशात; ४ ते ६ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात; ४ आणि ५ जुलै रोजी सौराष्ट्र आणि ओडिशामध्ये; आणि ४ जुलै, २०२६ रोजी पश्चिम मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दि. ४ ते १० जुलै दरम्यान कोकण आणि गोव्यात; ४ ते ७ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रात; ४ ते ५ जुलै दरम्यान मराठवाड्यात; आणि ४ ते ८ जुलै दरम्यान गुजरातमध्ये. तर दि. ४ ते ६ जुलै दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छमध्ये सर्वदूर किंवा व्यापक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.










