Monu Murder Case: मुंबईतील केतन हत्याकांडाची घटना देशभर गाजत असतांना पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आता हरियाणाच्या रेवाडीमधून हे हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, पत्नीने तिच्या प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली. कालव्यात पतीचा मृतदेह सापडल्याची बातमी मिळावी, त्यानंतर पत्नी तन्नू तिच्या आई-वडिल, भावासह कसौली येथील माहेरून जादथल येथील सासरच्या घरी गेली. जसे काहीच झाले नाही असे दाखवले.
कुठला ही संशय येणार नाही अशा प्रकारे तिने अंत्यविधीपासून ते अंतिम संस्कारांपर्यंत सर्व सामाजिक आणि कौटुंबिक विधी पार पाडले. कुटुंबासोबत असताना, तिने पतीच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले, ज्यामुळे कोणालाही तिच्यावर संशय आला नाही. मोनू (२१) याचे गूढ त्याच्या मोबाईल फोनमधून मिळालेल्या कॉल डिटेल्स आणि डिलीटेड चॅट्समधून उलगडले. सुरुवातीला या घटनेला अपघात समजून कुटुंबाने दुर्लक्ष केले. मात्र पोलिसांकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनमधील संपूर्ण डेटा प्राप्त झाल्यावर तिच्यावर संशय बळावला. मोनू आणि तन्नू यांच्यात तब्बल ४९ वेळा कॉल झाल्याचे उघडकीस आले आहे.
घटना अशी घडली
दरम्यान हरियाणातील रेवाडीतील जडथल गावचा रहिवासी मोनू (२१) याची हत्या त्याची पत्नी तन्नू (१९) हिने तिच्या प्रियकराच्या संगनमताने केली. कसौली येथील रहिवासी असलेली मोनूची आरोपी पत्नी तन्नू आणि मुंडनवास येथील रहिवासी असलेला तिच्या प्रियकराचा मित्र हरिओम यांच्या अटकेनंतर हे प्रकरण उघडकीस आले. तपासात समोर आले की, तन्नूचे सोनू नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि त्याच्यासोबत मिळून तिने आपला पती मोनूच्या हत्येचा कट रचला होता.
मोबाईल फोन कॉल डिटेल्स, लोकेशनची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खुनाचा छडा लावण्यात आला. डीएसपी बावल सुरेंद्र शेओरन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. तपासात असे उघड झाले की, तन्नूचे सोनू नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी मोनूला संपवण्याचा कट रचला होता. सोनूने त्याचे मित्र हरिओम आणि अमन यांनाही या कटात सामील करून घेतले होते.
४९ वेळा फोन
सायबर तज्ञाच्या मदतीने डेटा पुनर्प्राप्त केल्यावर मोनू आणि त्याची पत्नी तन्नू यांच्यातील चॅट्स आणि घटनेच्या दिवशी केलेल्या ४९ कॉल्सचे रेकॉर्ड सापडले. यानंतर, कुटुंबाला हत्येचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडून पुनर्तपासाची मागणी केली. ८ जून रोजी, ज्या दिवशी मोनू बेपत्ता झाला, त्याने त्याची पत्नी तन्नूला ४९ वेळा फोन केला होता.
मात्र, ते फक्त एकदाच, सुमारे तीन मिनिटे बोलले. मोबाईल फोनवर सापडलेल्या चॅट आणि कॉलच्या तपशिलामुळे कुटुंबाचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी ११ जून रोजी मोनूचा मोबाईल फोन कुटुंबाकडे सुपूर्द केला. मोबाईल फोनमधील सर्व डेटा डिलीट करण्यात आल्यामुळे कुटुंबाला संशय आला. सायबर तज्ञाच्या मदतीने डेटा पुनर्प्राप्त केल्यावर डिलीट केलेले चॅट आणि कॉल रेकॉर्ड सापडले.
तरीही, मुलाचे अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत कुटुंबाने आपला संशय गुप्त ठेवला. विधी पूर्ण झाल्यावर, कुटुंबाने मोबाईल फोनमधून मिळालेले पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिले आणि हत्येचा एफआयआर दाखल करून तपासाची मागणी केली. कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही.
त्यानंतर कुटुंबीयांनी २१ आणि ३० जून रोजी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. २ जुलै रोजी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली आणि पोलिसांनी आरोपी पत्नी तन्नू आणि सोनूचा प्रियकर हरिओम यांना अटक केली. सोनूचा प्रियकर अजूनही फरार आहे.
मोनूला कालव्यात फेकले
पोलिस सूत्रांनुसार, योजनेचा भाग म्हणून तन्नूने तिचा पती मोनूला कसौली गावात बोलावले. तिथे आधीच उपस्थित असलेल्या हरिओम आणि अमनने त्याला पकडले आणि कथितरित्या त्याचे तोंड व नाक दाबून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी आणि ही घटना अपघात वाटावी यासाठी त्यांनी मोनूला असलवास कालव्यात फेकून दिले.
मोनू औषध आणण्यासाठी बाहेर पडला होता.
पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र शेओरन यांनी माहिती देतांना सांगितले की, जडथल गावातील रहिवासी रतनलाल यांनी ८ जून रोजी कसौली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा मोनू रात्री १० वाजता औषध आणण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरवरून घरातून बाहेर पडला, पण रात्री उशिरापर्यंत परत आला नाही. पोलिसांनी मोनू हरवल्याची तक्रार दाखल केली आणि त्याचा शोध सुरू केला.
दि. १० जून रोजी, असलवास गावातील कालव्यात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. तो मोनूचा होता. त्याची इलेक्ट्रिक स्कूटर कालव्याजवळ सापडली. मोनूच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत, ज्यामुळे सुरुवातीला हा अपघात किंवा बुडून मृत्यू झाल्याचे सूचित झाले.
ही हत्या आहे असा कुटुंबियांना संशय आला. त्यानंतर, पोलिसांनी हत्येचा आरोप जोडला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.तेव्हा मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी केल्यानंतर, पोलिसांना मृताची पत्नी तन्नू आणि हरिओम यांच्यावर संशय आला.
अंतिम फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र शेओरन यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणात एफएसएलच्या अंतिम अहवालाची वाट पाहत आहेत. या अहवालातून मोनूचा मृत्यू गुदमरल्याने झाला की बुडून, हे स्पष्ट होईल. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपींच्या अटकेनंतर संपूर्ण घटनेचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला जाईल. तपास सुरू असून, उपलब्ध पुरावे आणि एफएसएलच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.











