Maharashtra Weather Update: राज्यातील काही जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच दरम्यान आता शुक्रवारी (3 जुलै 2026) राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.






