Jalgaon news : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अकोला येथे भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई केलेल्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-1) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद राहत्या घरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. घराचे कुलूप तोडून मागील बाजूने शिडीच्या साहाय्याने आत प्रवेश करणाऱ्या दोघांना जळगाव पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी किरण चौधरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. त्या अनुषंगाने जळगावातील साईप्रभा आर्केड, गणेश कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घराची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याने एसीबीच्या जळगाव पथकाने सदर घर सीलबंद करून सुरक्षित ठेवले होते. शनिवारी रात्री उशिरा घरातून संशयास्पद आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता घराच्या मागील बाजूने शिडी लावून दोन जण आतमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही जागीच ताब्यात घेतले.
पुरावे नष्ट करण्याच्या संशयातून गुन्हा
प्राथमिक तपासात संशयितांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात अनधिकृत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले आहे. घरातील मौल्यवान वस्तू अथवा एसीबीच्या तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकणारे पुरावे हटविणे किंवा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 207/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(अ), 331(2), 238 व 62 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी एसीबी, जळगावच्या पोलीस निरीक्षक स्मिता वसंत नवघरे यांनी तक्रार दाखल केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रसाद वसंत नारखेडे (33, रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण अशोक महाजन (36, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही संशयित हे किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.










