Jalgaon News: मराठी माणसाने अपरंपार प्रेम केलेला कलावंत म्हणजे ‘बालगंधर्व’ त्यांच्या जन्मदिनी दि. २६ जून रोजी म्हाळस परिवार आणि गंधार कला मंडळातर्फे ‘बाल गंधर्व एक नक्षत्र’ शास्त्रीय आणि सुगम गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजता,३७, आसरा संकुल, बळीराम मंदिराजवळ, बळीराम पेठ येथे ‘बालगंधर्व एक नक्षत्र’ ही शास्त्रीय आणि सुगम गायनाची मैफल होणार असून या मैफलीचा रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मैफिलीत गायिका प्राची कावळे, मुंबई, जयपूर अत्रोली घराणे, तसेच दीक्षा सचिन पानपाटील, पुणे एम.ए. म्युझिक या गायन सादर करतील. त्यांना हार्मोनियम संगत भूषण खैरनार तर तबला संगत राहुल कासार करतील.या मैफिलीस जळगावकर रसिकांनी उपस्थित राहून शास्त्रीय आणि सुगम गायनाचा आस्वाद घ्यावा, असे हेमंत म्हाळस आणि गंधार कला मंडळाच्या अध्यक्ष विशाखा देशमुख यांनी कळवले आहे.
बालगंधर्व हे मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट आणि नाट्यनिर्माते होते, त्यांचे मूळ नाव नारायण श्रीपाद राजहंस असे होते. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील नागठाणे येथे जन्मलेल्या या महान कलाकाराने आपल्या सुरेल गायकीने आणि स्त्री-भूमिकांद्वारे मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ मिळवून दिला. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा म्हाळस परिवार आणि गंधार कला मंडळाचा चांगला प्रयत्न आहे.










