होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अन्न-औषध प्रशासन कारवाई: प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत व्यापाऱ्यांना दोषी ठरवू नये; महाराष्ट्र चेंबरचे शिष्टमंडळ मंत्री झिरवाळाच्या भेटीला

On: June 29, 2026 2:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकार व्यापारी व उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. व्यापाऱ्यांच्या मालाच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल २४ तासांच्या आत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सुनिता फाल्गुने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

यावेळी मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, मालाच्या नमुन्याचा प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत संबंधित व्यापाऱ्याला दोषी मानले जाणार नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग नियमानुसार कार्यरत असून प्रामाणिक व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही किंवा चुकीची कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपाध्यक्षा सुनिता फाल्गुने यांनी निवेदन सादर करून नमुना तपासणीचे अहवाल सध्या तीन-तीन महिने प्रलंबित राहतात, त्यामुळे अहवाल येईपर्यंत व्यापाऱ्यांना दोषी ठरवू नये, अशी मागणी केली. तसेच व्यापाराचे हित आणि ग्राहकांचे आरोग्य जपण्यासाठी नमुना तपासणीचा अहवाल २४ तासांत उपलब्ध करून देणारी सक्षम यंत्रणा उभारावी, कोणत्याही नवीन कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी सहा महिन्यांचा ‘ग्रेस पिरियड’ द्यावा आणि त्या कायद्याबाबत व्यापारी व ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या. विनाकारण होणारी व्यापाऱ्यांची बदनामी व त्रास थांबविण्याचीही मागणी करण्यात आली.

खाद्यतेल व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रकाश पटेल यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. माजी विश्वस्त विलास शिरोरे यांनी ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या, तर कार्यकारिणी सदस्य गंगाधर निखाडे यांनी गावातील छोट्या व्यापाऱ्यांना स्पर्धेच्या काळात व्यापार करणे कठीण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

या शिष्टमंडळात माजी विश्वस्त विलास शिरोरे, कार्यकारिणी सदस्य डॉ. मिथिला कापडणीस, सचिन शहा, आशुतोष गायकवाड, गंगाधर निखाडे, स्वप्नील जैन, महेश मालपुरे, दीपक शेंडे, खाद्यतेल व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल तसेच चांदमल भन्साळी, मदन पिचा, प्रदीप भांगडिया, विलास भाऊ, ज्ञानेश्वर मुर्तडक, पंकज लोढा, पवन लोढा, भूपेंद्रसिंग रेखी, संतोष आहिरे, ललित सामनानी, श्याम सामनानी, श्याम लढ्ढा, आकाश डागा आणि महाराष्ट्र चेंबरचे सहायक सचिव अविनाश पाठक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment