Dharangaon News: धरणगावातील इंडेन गॅस एजन्सींच्या मनमानी, निष्काळजीपणा आणि ग्राहकांशी होणाऱ्या उद्धट वर्तनामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, एजन्सींच्या बेजबाबदार कारभाराविरोधात ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गॅस बुकिंग करून महिनाभर वाट पाहायची, एजन्सीला प्रत्यक्ष जावून अथवा फोन केला तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात, आणि सिलेंडर घ्यायला गेलो तर जादा पैसे मोजायचे! ही केवळ एखाद्या एकट्या ग्राहकाची व्यथा नाही, तर आज धरणगाव तालुक्यातील हजारो सर्वसामान्य कुटुंबांची रोजची जळजळीत वस्तुस्थिती बनली आहे. गॅससारखी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या एजन्सींनी ग्राहकांना सुविधा देण्याऐवजी त्रास देण्याचेच काम सुरू केले आहे का, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
बुकिंग होते, पण सिलेंडर मात्र गायब! ग्राहकांनी वेळेवर ऑनलाइन किंवा फोनद्वारे सिलेंडर बुकिंग केल्यानंतरही तब्बल २५ ते ३० दिवस उलटून देखील सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. दररोज एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागतात, फोन केल्यास प्रतिसाद मिळत नाही, आणि विचारणा केल्यास उद्या येईल, गाडी निघाली आहे, स्टॉक नाही अशी नेहमीची ठरलेली उत्तरे दिली जातात. या दिरंगाईमुळे गृहिणींची मोठी गैरसोय होत असून, अनेक कुटुंबांना पर्यायी इंधनाचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या महागाईत हा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही.

जादा पैसे घेत असल्याचा आरोप
ग्राहकांकडून सिलेंडरच्या अधिकृत दरापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. होम डिलिव्हरी चार्ज, वाहतूक खर्च, कामगार खर्च अशा विविध नावाखाली ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम उकळली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे, या बाबत प्रश्न विचारल्यास एजन्सीकडून स्पष्ट उत्तर दिले जात नाही. उलट ग्राहकांनाच दमदाटीचा सूरात उद्धट भाषा करून ग्राहकांचा अपमान केला जातो.
ग्राहकांची नाराजी
संबंधित एजन्सीतील काही कर्मचारी, एजन्सी चालक महिला आणि संबंधित व्यक्तींच्या वागणुकीबाबत आहे. तक्रार मांडण्यासाठी गेलावर ग्राहकांशी उर्मट भाषेत बोलणे, उडवाउडवीची उत्तरे देतात, फोन कट करणे किंवा तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. सेवा देणाऱ्यांनीच ग्राहकांचा अपमान करणे ही अत्यंत गंभीर बाब असून, ग्राहक देवो भव ही संकल्पना येथे केवळ फलकापुरतीच उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाचा वचक संपला का?
धरणगावातील गॅस एजन्सींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि तालुका पुरवठा निरीक्षक या जबाबदार अधिकाऱ्यांचा एजन्सींवर कोणताही प्रभाव दिसून येत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असंख्य तक्रारी असूनही ठोस कारवाई होत नसल्याने एजन्सी चालकांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे ते अधिकच बेफिकीरपणे ग्राहकांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे हे मौन आणि निष्क्रियता नागरिकांच्या रोषात आणखी भर घालत आहे.
अनेक ग्राहक अन्याय सहन करत असले तरी औपचारिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. उद्या पुन्हा त्यांच्याकडूनच सिलेंडर घ्यायचा आहे या भीतीपोटी अनेक जण गप्प बसतात. हीच भीती एजन्सींच्या मनमानीला खतपाणी घालत आहे. ग्राहकांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची हीच वेळ आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून एजन्सींच्या कारभाराची व अतिरिक्त पैसे आकारणाऱ्यांवर आणि ग्राहकांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगासह, त्वरीत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, यासह सिलेंडर वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी अशी जोरदार मागणी केली आहे आणि सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा प्रश्न हा केवळ सिलेंडरपुरता मर्यादित नाही तर जगण्याशी निगडित आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन ग्राहकांना न्याय द्यावा, अशी तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे.






