Nashik News: महाराष्ट्र आजही महान आहे. विवेकी जनताही येथे आहे. परंतु महाराष्ट्राची ही ओळख पुसली जात आहे. म्हणजेच आपल्याकडील समाजभान कुठे तरी हरवत चालली आहे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. असे विचार एबीपी माझा वृत्त वाहिनीच्या संपादक सरिता कौशिक यांनी येथे व्यक्त केले. नाशिकची तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी रविवारी प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याखानात ‘महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान’ या विषयावर 10 वे पुष्प गुंफले. राहाता (अहिल्यानगर) येथील पंचकृष्ण डेअरीचे संचालक सुनिल सदाफळ, श्रीमती शोभना मेणे व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. प्रा. सुरेश मेणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरेश कपाडिया यांनी श्रीमती कौशिक यांचा, तर मनीष सानप यांनी सदाफळ यांचा सत्कार केला. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. दरम्यान, व्याख्यानमालेच्या परंपरेत नव्याने समाविष्ट झालेल्या चित्र प्रदर्शनाच्या शृंखलेत प्रतिभा अहिरे यांनी आपला कलाविष्कार सादर करत उपस्थित रसिकांची दाद मिळविली. त्यांचाही यावेळी सत्कार झाला.

श्रीमती कौशिक म्हणाल्या की, महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र, तर सत्याचे विज्ञान म्हणजे राजकारण ही म. गांधींनी केलेली व्याख्या आपण गृहीत धरू या. तर जाणकार नेते निवडून देणारी जनता असणे म्हणजे समाजभान असे मानले, तरी असे समाजभान असलेले नेते आपल्याकडे आहेत का? हा खरा प्रश्न आहे आणि म्हणुनच आजचे राजकारण दिशाहीन होत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रीय स्तरावर याची खरी सुरुवात आणीबाणीच्या काळात झाली. आपल्या राज्यापुरता विचार करायचा झाल्यास माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे उदाहरण देता येईल. या पासून ते शिवाजी पाटील निलंगेकर यांच्यापर्यंतची विविध उदाहरणं देत त्यांनी कॉंग्रेस काळातील राजकारणाचा आढावा घेतला. गो. रा. खैरनार यांच्या कार्यपद्धतीचाही त्यांनी उल्लेख केला.
आज राज्यात वेगळे आणि केंद्रात वेगळे सरकार अशी नीती आहे. या संपुर्ण स्थित्यंतरांत अनेक बाबींचा समावेश आहे. काही गोष्टी बदलल्या तर काही तशाच राहिल्या. नेतेच मोठे होत गेले. यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. समाजभान हरवत गेले. खरे तर महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. तद्वतच हे सांगणाऱ्या विद्वानांचीही परंपरा आहे. त्यामुळे आजचा महाराष्ट्र हा आपला महाराष्ट्र नाहीच. महाराष्ट्राच्या अर्थकारणात 1990 च्या काळात मोठा बदल झाला आणि तेव्हापासूनच प्रचंड वेगाने तो वाढत आहे. नेते बदलले तसे कार्यकर्तेही बदलले अन् विचारधारा मात्र मागे पडली. त्यातूनच समाजभान मागे पडले. कारण या दोन्हींचा परस्पर संबंध असतो. यावर भाष्य करण्यासाठी 11वेळा निवडून आलेले आमदार गणपतराव देशमुख यांचे उदाहरण बोलके आहे. असे राजकारणी आपल्या राज्यात होते, हे आज कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.
अफलातुन ‘मुरकी’
ज्ञानयज्ञाच्या दुसऱ्या सत्रात अफलातुन म्युझिकल ग्रुप प्रस्तुत ‘मुरकी’ हा महान पार्श्वगायक मुकेश-रफी- किशोर यांच्या सदाबहार चित्रपट गितांचा कार्यक्रम झाला. यामध्ये हरीशभाई ठक्कर, मनोज पळसकर, राजेंद्र पवार, गुलाब वाघ, अनिल पोटे, रोहिणी पांडे, सुगंधा शेलार यांनी जुन्या काळातील गाजलेली गाणी सादर केली. गिरीशभाई ठक्कर यांच्या बहारदार निवेदानाने रसिकांना खिळवून ठेवले.






