Nashik News: शिवरायांचे चरित्र आजही रोज नव्याने समजून घेण्याचा विषय आहे. पण त्यांचा खरा ईतिहास संपूर्ण रूपात कधीच पुढे आलेला नाही. त्याबाबत जवळपास सर्वच पिढ्यांमध्ये वाद घडलेले आढळतात. याचे मुळ कारण म्हणजे महाराजांचे चरित्र आपण कधीच आपल्या आचरणात आणु शकलो नाही. असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास व दुर्ग अभ्यासक, शिवव्याख्याते संदीप तापकीर यांनी येथे केले.
वसंत व्याख्यानमालेच्या 103 व्या ज्ञानसत्रात 14वे पुष्प गुंफताना स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याखानात ‘शिवरायांशी नित्य आठवावे । नि जीवित तृणवत मानावे’ या विषयावर ते बोलत होते. योगेश खैरे व्यासपीठावर होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आणि स्व. पंडितराव खैरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्ष प्रा. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला. सुदर्शन कुलथे यांनी स्वागत केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
दरम्यान, चित्र प्रदर्शनाच्या शृंखलेत आज नाशिकच्या कलानिकेतन महाविद्यालयातील वैभवी सुहास भगत, सोनाली दशरथ पाडवी, शेख अल्फिया चांद या विद्यार्थिनींच्या कलाकृती मांडण्यात आल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तापकीर म्हणाले की, गेली 400 वर्षे महाराष्ट्रातील गावागावात छत्रपती शिवरायांचा जयजयकार होत असतो. या काळात अनेक पिढ्यांनी शिवरायांचा अभ्यास केला आहे. परंतु छत्रपतींना अभिप्रेत असलेले स्वराज्य, महाराष्ट्र आज कुठे दिसतो का? असा प्रश्न स्वाभाविकच पडतो. त्यातून महाराष्ट्राचं क्षेत्र अत्यंत संकुचित झाले आहे, असे वाटु लागते.

महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या कर्तूत्वाचे दाखले नेहमीच दिले जातात. पण त्यांच्या केवळ आरमाराचा जरी आपण अभ्यास केला असता तरी आपल्याला 26/11 च्या प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. अशा पार्श्वभूमीवर त्यांचं चरित्र आपण जगण्याची गरज आहे. त्यांचं चरित्र म्हणजे निष्कलंक विचारांचा महामेरू आहे. या चरीत्राचा अभ्यास करण्याची असंख्य साधनं आज उपलब्ध आहेत.
त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचा वेगळा गुण आणि त्यांच्या स्वभावाचा वेगळा पैलु आपण शिकु शकतो, असे सांगत त्यांनी इतिहासातील अनेक दाखले देत महाराजांचे विविध गुण आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलु उलगडून दाखवले. महाराज केवळ युध्दात रमले नाही, तर नानाविध क्षेत्रांत त्यांचे कार्य सुरू होते. महाराजांचे शौर्य, त्यांची कल्पकता, त्यांची कार्यपद्धती आणि कर्तुत्व, त्यांची दुरदृष्टी अशा अनेक पैलुमधुन आपल्याला हा इतिहास रोज नव्याने अभ्यासता येतो. या प्रत्येक पैलुमधून आपण काय शिकावे, या बाबतही त्यांनी यावेळी चर्चा केली.
‘वारसा शौर्याचा’ द्वारे अनुभवली शिवसृष्टी
व्याखानानंतर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित इंडोस्टेज क्रियेषण प्रॉडक्शन प्रस्तुत ‘शिव छत्रपती : वारसा शौर्याचा’ हा भव्य ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, पराक्रम, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश आदी प्रभावीपणे उलगडण्यात आले. आधुनिक प्रकाशयोजना, संगीत, नृत्य, नाट्यरूप सादरीकरण आणि दृश्य तंत्रज्ञानाच्या या आविष्कारातून कलावंतांनी शिवचरित्रातील विविध प्रसंग जिवंत केले. जाणार आहेत.
सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सादरीकरणाची संकल्पना व दिग्दर्शन प्रज्ञा सागडे यांनी केले, तर नृत्य दिग्दर्शन प्रियंका शिंदे यांचे होते. संगीत संयोजन दीपक वाळके यांनी, तर ध्वनी व्यवस्था महेश आंबेकर यांनी सांभाळली.






