jalgaon News: उघड्यावरील मांस विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहर आणि परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर, उघड्यावरील मांस विक्रीवर तात्काळ बंदी आणणे आणि मनपाच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यासाठी आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि मनपा महापौर यांना लेखी निवेदन देण्यात आले.
शहरात सद्यस्थितीत विविध नागरी वस्त्यांमध्ये आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला अत्यंत भयानक, अस्वच्छ आणि बेकायदेशीर (अनधिकृत) रित्या उघड्यावर मांस विक्री सुरू आहे. महानगरपालिकेने यासंदर्भात स्पष्ट नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असतानाही, तिची सर्रास पायमल्ली केली जात आहे. या गंभीर प्रकारामुळे जळगावकर नागरिकांच्या आरोग्याचा आणि जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या निवेदनाचा आशय असा
हिंस्त्र कुत्र्यांचा हैदोस, मानवी जिवाला धोका
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांमधून उरलेले मांसाचे तुकडे, रक्त आणि हाडे रस्त्यावर व कचराकुंडीत उघड्यावर टाकून दिली जातात. हे अन्न खाऊन रस्त्यावरील भटके कुत्रे अत्यंत क्रूर आणि हिंस्त्र बनत आहेत. परिणामी, शहरात लहान मुलांवर आणि पादचाऱ्यांवर कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केल्याच्या व त्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.
मनपा नियमावली, कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन
महानगरपालिकेने मांस विक्रीसाठी परवाना (License), बंदिस्त जागा, स्वच्छतेचे निकष आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची नियमावली तयार केली आहे. मात्र, या दुकानदारांकडून या सर्व नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ (FSSAI) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील तरतुदींनुसार निवासी भागात आणि उघड्यावर अशा प्रकारे मांस कापण्यास व विकण्यास सक्त मनाई आहे. हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर व शिक्षेस पात्र आहे.
आरोग्यास धोका आणि नागरी वस्त्यांची दुरवस्था
नागरी वस्त्यांमध्ये तसेच मुख्य बाजारपेठेत या अनधिकृत दुकानांमुळे तीव्र दुर्गंधी पसरत असून, संसर्गजन्य आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना या परिसरामधून प्रवास करणे असह्य झाले आहे.
*तात्काळ कारवाई व सील ठोकणे: शहरातील नागरी वस्त्यांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेला सुरू असलेली सर्व अनधिकृत व उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने त्वरित प्रशासकीय बळाचा वापर करून बंद करण्यात यावीत व ती सील करण्यात यावीत.
*फौजदारी गुन्हे दाखल करणे: मनपाच्या नियमांचे आणि न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.
*नियमित गस्त व तपासणी: मनपाच्या स्वच्छता आणि अतिक्रमण विभागातर्फे शहरात नियमित गस्त घालून, छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अशा व्यवसायांवर दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात यावी.
*कचरा विल्हेवाटीवर कडक निर्बंध: मांस विक्रेत्यांनी त्यांचा कचरा कुठेही रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी.
जळगाव शहरातील नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे (भारतीय संविधानाचे कलम २१) हे थेट उल्लंघन आहे. जर महानगरपालिका प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन पुढील ७ दिवसांच्या आत ठोस व प्रत्यक्ष कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे.










