Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवालचे काका, विजय अग्रवाल, म्हणाले की त्यांच्या कुटुंबाला फक्त न्याय हवा आहे. ते म्हणाले की केतन एक सुशिक्षित आणि हुशार तरुण होता, ज्याने कुटुंबाच्या विनंतीवरून ठरवलेल्या लग्नाला होकार दिला होता. कुटुंबाचे म्हणणे आहे, की आता त्यांचा कायद्यावर विश्वास आहे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेल, अशी अपॆक्षा व्यक्त केली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पोलीस त्यांचे मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि घटनास्थळावरून गोळा केलेल्या इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. तपास यंत्रणांचा विश्वास आहे की चौकशी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे समोर येतील. तसेच या प्रकरणी गुरुवारी विधानसभेत एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
हत्येचा प्लान कोणाचा?
देशाला हादरवून सोडणाऱ्या केतन हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होता आहे. पोलीस केतन हत्येचा प्लान नेमका कोणाचा याचा शोध घेत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी एकमेकांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. आत हे प्रकरण वेगळेच वळण घेत आहे. त्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. दरम्यान, तपासादरम्यान समोर आलेल्या काही प्राथमिक पुराव्यांनुसार सिया हीच या हत्येची सूत्रधार असल्याचे दिसत आहे.
पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू पावलेल्या २६ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाने कलाटणी घेतली असून या प्रकरणाकडे हत्येचा कट असल्याचे मानून पोलीस चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेली वादग्रस्त वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी, हे आता चौकशीदरम्यान एकमेकांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप करत आहेत. पोलिसांना त्यांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या आहेत. तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे की, आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सिया गोयलकडेच निर्देश करत आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यानंतर सिया आणि केतन यांचे या वर्षी लग्न होणार होते. चौकशीदरम्यान, सियाने दावा केला की तिला लग्न करायचे नव्हते आणि तिने केतनला याबद्दल अनेक वेळा सांगितले होते. सियाचा आरोप आहे की चेतन चौधरीने केतनला संपवण्याचा कट रचला. दुसरीकडे, चेतनने पोलिसांना सांगितले आहे की सियाने त्याच्यावर केतनला मारण्यासाठी दबाव टाकला होता. या परस्परविरोधी जबाबांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस दोघांचीही सतत चौकशी करत आहेत.
या संपूर्ण कटाची सूत्रधार सिया होती का?
दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांवरून असे सूचित होते की, या संपूर्ण कटामागे सिया गोयलच सूत्रधार असू शकते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन गेल्या वर्षी एका दिवाळी पार्टीत भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले आणि सतत संपर्कात राहिले. तपास यंत्रणांना संशय आहे की, त्या दोघांनी केतनच्या हत्येचा कट रचला होता.
हत्येचा पहिला प्रयत्न आधीच झाला होता का?
पोलिसांच्या तपासात हेही उघड झाले आहे की, सिया आणि केतन ३१ मे रोजी लोहगड किल्ल्यावर गेले होते. याच काळात सियाच्या मनात केतनला ठार मारण्याची कल्पना आली असावी. हत्येचा पहिला प्रयत्न १४ जून रोजी झाला असावा, असाही पोलिसांना संशय आहे. असा आरोप आहे की, त्या दिवशी सियाने केतनला किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाल्यावर तिने साप दिसल्याची आरडाओरड केली आणि नंतर ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
सियाच्या आई-वडिल म्हणाले…
सिया गोयलच्या आई-वडिलांनीही या प्रकरणावर पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे. सियाची आई, पूजा गोयल यांनी म्हटले आहे की, जर त्यांची मुलगी दोषी आढळली, तर तिला कठोरतम शिक्षा झाली पाहिजे. तिने पुढे सांगितले की जो कोणी दोषी असेल त्याला सोडू नये. सियाचे वडील, प्रवीण गोयल, यांनीही सांगितले की केतन त्यांच्या मुलासारखा होता आणि एकाला गमावण्याचे दुःख सर्वात मोठे असते. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली.
लोहगड प्रकरणी आता एसआयटी चौकशीचे आदेश
पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरात नुकत्याच घडलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी गुरुवारी विधानसभेत दिले.
विधानसभेत सदस्य सुनील शेळके यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून या घटनेची गंभीरता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या प्रकरणाची माहिती देताना, लोहगड किल्ला परिसरात एका युवकाची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या झाल्याचा आरोप असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि संताप व्यक्त होत असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाचा सर्वंकष तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
यावर बोलताना तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.






