Gadchiroli News : गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्दैवी अशा या घटनेत एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाले आहेत. अखिल बिश्वास असे मृतकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, अखिल बिश्वास हे आपल्या सहकाऱ्यांसह मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करताना अचानक वीजेसह मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही झाडाखाली आश्रयाला गेले होते. तेव्हा अचानक वीज कोसळली. यात चौघेजण जखमी झाले आहेत. यात अखिल बिश्वास यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांवर रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
दरम्यान, राज्यभरात पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळ काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. तर, मुंबईतील पावसाच्या पहिल्याच दिवशी, गेल्या आठवड्यात महापालिकेचा एक अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती.
त्यानंतर, आता पुन्हा एकदा साकीनाका खैरनी रोड येथील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. अस्लम शेख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मोबाईलवर बोलत असताना अस्लम शेख हे साधारण सकाळी 11 च्या सुमारास मॅनहोलमध्ये पडले होते. जवळपास दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.






