होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शेतीत उल्लेखनीय कामगिरी: उत्कृष्ट शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांचा गौरव

On: July 4, 2026 12:20 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये मका, कांदा, सोयाबीन, गहू, हरभरा आदी विविध पिकांमध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विस्तार व इतर क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.

कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन नाशिक जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, महाफेड तसेच सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतमध्ये करण्यात आले होते.

या कार्यक्रमास दिडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खासदार भगरे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचा प्रसार करून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी कुंभ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आगामी खरीप हंगामात प्रभावीपणे करण्याचे आवाहन केले. मृदा परीक्षण, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धन यांवर भर देऊन शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमात एकूण १२ कृषी स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, एस.पी. अॅग्रो, अहिल्यानगर यांचे कांदा लागवड यंत्र व आधुनिक फवारणी यंत्र, तसेच क्लिनएनर्जी, पुणे यांचे बायोगॅस संयंत्र यांसह विविध कृषी नवकल्पना आकर्षणाचे केंद्र ठरल्या. उपस्थित शेतकरी व अधिकाऱ्यांनी या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय धात्रक यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी दीपक सोमवंशी व विजय केदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी उपसंचालक महेश वेटेकर, जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या तंत्र अधिकारी श्रीमती योजना राजपूत यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अखेरीस आभार वरुण पाटील, कृषी विकास अधिकारी यांनी मानले.

कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, कृषी उद्योजक व विविध संस्थांच्या सहभागातून कृषी क्षेत्रातील नावीन्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment