Mumbai News: आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या गरजू नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील रुईखेडा व चारमळी या गावांमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. सदस्य अमोल जावळे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, रुईखेडा आणि चारमळी ही गावे १०० टक्के आदिवासी उपयोजना (टीएसपी) क्षेत्रात येत असल्याने या गावांसाठी दोन महत्त्वाच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून १० जून २०२६ पासून चारमळी गावात सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे.

या भागातील वीजपुरवठ्याच्या प्रश्नाबाबतही शासन गंभीर असून संबंधित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीत वाढ करण्यात आली आहे. ३० जुलै पूर्वी संबंधित ऊर्जा विभाग, वन विभाग आणि वित्त विभागाची संयुक्त बैठक घेऊन विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही डॉ. वुईके यांनी यावेळी दिली.










