Jalgaon News: नीट पेपर फुटल्यामुळे ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या अपयशाची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.
खडसे म्हणाल्या की, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पोलीस भरती अंतर्गत येणाऱ्या (SRPF) लेखी परीक्षेत एका खासगी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील प्रश्न आले होते. त्यावेळी आम्ही आवाज उठवला होता. आता नीट परीक्षेबाबतही असाच प्रकार घडला आहे. २८१ प्रश्न असलेल्या (guess paper) मधील १३१ प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेत घेतले गेले आहे. देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी होते असे त्यांनी सांगितले.

मोठी काटकसर करून, मेहनत करून, अनेक स्वप्ने उराशी बाळगून विद्यार्थी आणि त्यांचे पालक या परीक्षांची तयारी करत असतात मात्र व्यवस्थेतील दलाल या सर्व गोष्टींवर पाणी टाकतात. एवढी मोठी परीक्षा घेणारी यंत्रणा इतकी कुचकामी कशी ठरते? यंत्रणेतील लोक यात सहभागी असल्याशिवाय इतका मोठा भ्रष्टाचार करता येणार नाही, असंही त्या म्हणाल्या तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. यात जे कोणी सहभागी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यासोबतच मागील महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या SRPF लेखी परीक्षेतही चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले हेही कळले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.






