JMC News: जळगाव शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बाब समोर आली आहे. मनपाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तब्बल 139 शिक्षक उपलब्ध असताना, या सर्व शिक्षकांनी मिळून संपूर्ण शहरातून अवघ्या 70 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून विद्यार्थ्यांना मोफत सुविधा पुरवल्या जात असताना, दुसरीकडे मात्र शिक्षक केवळ महिन्याचा पगार उचलण्यात मग्न असून विद्यार्थी संख्या वाढवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र उघड झाले आहे.

सुविधांचा पाऊस, पण पटसंख्या कागदावरच!
महापालिका प्रशासनाकडून शाळांची सुसज्ज इमारत, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, पुस्तके आणि दर्जेदार पोषण आहार पुरवला जात आहे. एवढेच नव्हे तर, यंदापासून मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ माध्यम देखील सुरू करण्यात आले आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवता यावेत यासाठी प्रशासनाने पालकांसाठी विशेष कॅम्प आयोजित करणे, विविध योजनांचा लाभ देणे आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची खुली मुभा दिली होती. तरीही शिक्षकांकडून मिळालेला हा थंड प्रतिसाद पालकांमध्ये आणि प्रशासनात संताप निर्माण करणारा ठरत आहे.
अंगणवाड्यांमध्ये ‘केजी’ वर्ग, तरीही पहिली रिकामी
मनपाच्या अंगणवाड्यांमध्ये सीनियर आणि ज्युनियर केजीचे वर्ग यशस्वीरित्या सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. बालवाडीतूनच विद्यार्थ्यांना मनपाच्या शिक्षण व्यवस्थेशी जोडण्याची उत्तम संधी उपलब्ध असताना, प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश निश्चित करण्यासाठी साधी धडपडही केली नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मोठी घसरण
जळगाव मनपाच्या एकूण 23 शाळांपैकी 12 मराठी, 10 उर्दू आणि 1 हिंदी माध्यमाची शाळा आहे. गेल्या वर्षीची (2025-26) माध्यमनिहाय आकडेवारी पाहिल्यास राठी माध्यमात 50 शिक्षकांच्या भरवशावर 821 विद्यार्थी होते. उर्दू माध्यमात 86 शिक्षकांकडे 3795 विद्यार्थी होते.
तर हिंदी माध्यमात ३ शिक्षकांकडे 57 विद्यार्थ्यांची संख्या होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 139 शिक्षकांनी मिळून पहिलीच्या वर्गात केवळ 70 विद्यार्थ्यांचा केलेला प्रवेश हा शिक्षकांच्या कामावरील निष्ठा आणि कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
कारवाई होणार का?
शासनाकडून दरमहा लाखो रुपयांचा पगार घेणारे हे शिक्षक विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी कंबर का कसून काम करत नाहीत, असा सवाल आता नागरिकांना उपस्थित होणार आहे. मनपा प्रशासनाने दिलेल्या सवलती आणि सुविधांचा गैरफायदा घेतला जात असून, या बेजबाबदार शिक्षकांवर प्रशासन कठोर प्रशासकीय कारवाई करणार की नेहमीप्रमाणे डोळेझाक करणार, याकडे आता संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे.








