होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

JMC News: जळगावात स्वच्छता, आरोग्य आणि रस्त्यांचा प्रश्न गंभीर! महासभेत नगरसेवक आक्रमक!

On: July 8, 2026 7:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: पावसाळा सुरु झाला असून पहिल्याच पावसापासून शहरात स्वच्छतेचा बोझवारा उडाला आहे. ठिक-ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, या सर्व समस्यांच्या गर्तेत जळगाव महानगरपालिकेची महासभा बुधवारी दुपारी १ वाजता पार पडली. या सभेत शहरातील प्रलंबित प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य, स्वच्छता आणि प्रशासकीय अनागोंदीवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

 

यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जिवने, उपमहापौर मनोज चौधरी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मनपाला प्रथमच IAS अधिकारी मिळाल्याबद्दल नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी नवनियुक्त आयुक्तांचे संपूर्ण सभागृहाच्यावतीने अभिनंदन केले. तसेच महापौर दीपमाला काळे या सायकलवरून पंढरपूरला जात असल्याने त्यांनी जळगावच्या विकासासाठी विठ्ठलाला साकडे घालावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

 

फाइल्स गहाळ आणि माहिती लपवल्याचा आरोप

 

दरम्यान, नगरसेवक नितीन बरडे यांनी मनपातील फाइल्स गहाळ होण्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. अधिकारी मॅनेज होऊन चुकीच्या परवानग्या देतात आणि पुरावा नष्ट करण्यासाठी फाइल्स गायब केल्या जातात, असा थेट आरोप त्यांनी केला. तर मनपाने मेहरूण शिवारात भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांची माहिती अधिकारी लोकप्रतिनिधींना नीट देत नाहीत, मग सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी उपस्थित केला.  महासभेच्या अजेंड्यावर शहराच्या थेट विकासाचा एकही विषय नसल्याबद्दल नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि पाणी साचण्याच्या समस्या

 

एम जे कॉलेज रस्ता रुबी हॉस्पिटलजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची येथे नेहमी वर्दळ असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे, याकडे नगरसेविका ॲड. सुचिता हाडा यांनी लक्ष वेधले.

 

पाणी साचून रहदारीला अडथळा

 

नटवर टॉकीज व सरस्वती डेअरी परिसरात पावसाचे पाणी साचून रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. नुकतेच एक अवजड वाहन येथे अडकल्याची माहिती विष्णू भंगाळे यांनी दिली. यावर शहर अभियंता योगेश बोरोले यांनी दोन दिवसांत नियोजनाचे आश्वासन दिले.

 

 अवजड वाहनांमुळे रस्ते खराब

 

अयोध्यानगर परिसरात रेतीचे ट्रॅक्टर आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता खराब झाल्याचे नगरसेवक सुनील खडके यांनी सांगितले. तर प्रभाग २ मधील गटारी व रस्त्यांच्या समस्यांचा पाढा वाचत, तिकडे एकही अधिकारी फिरकत नसल्याची खंत उज्वला बाविस्कर यांनी व्यक्त केली.

 

 आरोग्य, स्वच्छता आणि अतिक्रमण

 

मेहरूण तलावात अस्वच्छ पाणी सोडले जात असल्याची तक्रार जयश्री महाजन यांनी केली. तर हुडको परिसरातील सेफ्टी टँक ओव्हरफ्लो होऊन घाणीचे साम्राज्य पसरले असून रोगराईची भीती असल्याचे विजय बांदल यांनी सांगितले. यावर आयुक्तांनी तत्काळ पाहणी करून उपाययोजनांचे आदेश दिले.

 

श्वान निर्बीजीकरणात मक्तेदारचा मोठा घोटाळा?

 

नगरसेविका प्रतीक्षा सोनवणे यांनी जळगाव शहरातील श्वान पकडणाऱ्या मक्तेदाराविरुद्ध थेट पुरावेच सादर केले. शहरात आतापर्यंत १५०० ते १६०० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तरीही ठेकेदार एकाच कुत्र्याचे वेगवेगळ्या अँगलने ३-४ फोटो काढून मनपाकडून जास्तीचे पैसे लाटत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला व टेंडर बदलण्याची मागणी केली. यावर आयुक्त आदित्य जीवने यांनी सांगितले की, सध्या ६० श्वानांची क्षमता असलेली जागा वाढवण्याचे काम सुरू असून, चौकशीत दोषी आढळल्यास ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

 

 ‘सफाई कर्मचारी’ हजेरी घोटाळा आणि डिजिटल तोडगा

 

प्रभाग ९ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टरवर ४४ सह्या आहेत, मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ २८ कर्मचारी हजर आढळल्याचा धक्कादायक प्रकार जयश्री पाटील यांनी उघडकीस आणला. यावर तोडगा म्हणून आयुक्तांनी लवकरच सर्व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीन सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

 

१७ मजली इमारतीत ‘लाईट युनिट’साठी १८ वा मजला बांधणार का?

 

सर्व मुख्य विभाग १७ मजली इमारतीत असताना, नागरिकांना गणपती नगरमधील लाईट युनिटसाठी दुसरीकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. “या युनिटसाठी मनपाला १८ वा मजला बांधावा लागेल की काय?” असा टोला लोकप्रतिनिधींनी लगावला. यावर आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून येथे लवकरच लाईट युनिट केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले. महासभेच्या शेवटी अजेंड्यावरील सर्व 19 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर राज्यगीत व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment