Jalgaon News: न्यायालय हे पक्षकारांसाठी असते व पक्षकारांच्या सुविधेसाठी हा नविन उपक्रम स्तुत्य आहे. त्या दृष्टीने न्यायालय व वकीलांमध्ये सलोखा असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे पक्षकार, वकील व न्यायालयीन कर्मचारी यांचे सुविधेसाठी नविन ए.टी.एम.मशीन बसविण्यात आलेले असून, त्याचा उद्घाटन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांचे हस्ते दि. ८ जुलै रोजी उत्साहात पार पडला. जळगाव जिल्हा वकील संघ यांचे कक्षात मार्गदर्शन करताना माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी संबोधित करतांना म्हणाले की, ए.टी.एम. सुविधा ही न्यायालयांमध्ये उपलब्ध नाही, ती या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संविधान प्रस्तावनेचे अनावरण केले. या उद्घाटन सोहळया प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, न्यायाधीश एस. व्ही. खोंगल, जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, वकील संघाचे पदाधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी वृंद व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या नविन सुविधेमुळे वकील व पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.








