Nashik News: नाशिकमधील इगतपुरी जवळच भावली धरण असून ठिकाणी असलेल्या धबधब्याजवळ एका महिला पर्यटकाचा विनयभंग झाल्याच्या घटनेनंतर तरुणांच्या एका गटाने तिच्या कुटुंबावर हल्ला केला आणि त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या आणि नुकसान केले. ते तेवढ्यावरच थांबले नाही तर थेट १५ ते २० किलोमीटरपर्यंत त्यांच्या कारचा पाठलाग करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर पीडित कुटुंबाने संबंधित प्रकारचा शूट केलेला व्हिडिओ टाकल्याने संताप व्यक्त होत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्या दहशत माजविणाऱ्या ९ जणांच्या टोळक्याला अटक केली आहे.
घटना अशी घडली
मिळालेली माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पासून काही किलोमीटर अंतरावर भावली डॅम आहे. हा परिसर पावसाळ्यात कायम पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नाशिकमधून सहलीला गेलेलय एका कटुंबातील महिलेचा काही युवकांनी कथित विनयभंग केला. त्याचा त्यांनी निषेध केला, तेव्हा काही तरुणांनी केवळ त्यांच्यावर हल्लाच केला नाही, तर त्यांच्या गाडीवरही हल्ला केला आणि सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने कुटुंबीय चांगलेच घाबरले..
दरम्यान एका व्हिडिओत कारमध्ये बसलेल्या कुटुंबावर दोन युवक हातातील हत्याराने हल्ला करतांना दिसून येत आहे. या थरारक घटनेने नाशिक हादरले आहे. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, ही घटना १२ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील भावाली धरण आणि धबधबा या पर्यटनस्थळी घडली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ते सहलीसाठी आले असताना जेवण करून आणि वेळ घालवून परत येत होते. या ठिकाणी दोन तरुणांनी कुटुंबातील एका महिलेसोबत अश्लील शेरेबाजी करून, शिट्टी वाजवणे आणि तिचा छळ करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने त्या दोन तरुणांना खडसावले. त्यानंतर तिच्या पतीने आणि दीराने त्यांना खडसावले आणि एका महिलेसोबत, असे का वागत आहात, असा सवाल त्यांनी केला यावेळी त्यांच्याशी वाद वाढला.
पोलिसांनी टवाळखोरांच्या आवळल्या मुसक्या
त्यानंतर लगेचच जवळच्या दुकानांमधून आणि गावातून ८-१० लोक आले आणि त्यांनी कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे पाहून, ते कुटुंब आपल्या गाडीतून नाशिकला निघून गेले. दरम्यान महिलेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आणि व्हिडिओ व तांत्रिक तपासाच्या आधारे नऊ आरोपींना ताब्यात घेतले. एका आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेतील एका आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी हे कडक शिस्तीचे अधीकारी म्हणून नाशिकला ओळख आहे. घटना समजताच पोलिसांनी टोळक्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील संबंधित ९ जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.








